विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची मंजुरी; वेदांत मारुती बंडगर हत्याप्रकरणी संघटित गुन्हेगारी टोळीवर मोठी कारवाई
सांगली, प्रतिनिधी :
सांगली शहरातील वेदांत मारुती बंडगर खून प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत 'एन.जी. ग्रुप' या संघटित गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लागू केला आहे. रंजन कुमार शर्मा यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, बालकासह ९ आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत पुढील तपासास परवानगी देण्यात आली आहे.
संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे करत होते. तपासादरम्यान टोळीप्रमुख निलेश विठोबा गडदे याने आपल्या साथीदारांसह 'एन.जी. ग्रुप' नावाची संघटित गुन्हेगारी टोळी उभारून सांगली जिल्हा तसेच कर्नाटकातील काही भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीचे कार्यक्षेत्र सांगली, मिरज, कुपवाड, जत, मिरज ग्रामीण, कवठेमहांकाळ तसेच कर्नाटकातील कागवाड आणि बनहट्टी परिसरापर्यंत पसरलेले आहे. सन २०१७ ते २०२६ या कालावधीत या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, गंभीर दुखापत, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जीवे मारण्याच्या धमक्या, दहशत निर्माण करणे तसेच इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे.
टोळीविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाईसाठी सरकारी अभियोक्त्यांचा अभिप्राय घेऊन प्रस्ताव पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. प्रस्तावाची छाननी केल्यानंतर मोक्का कायद्याअंतर्गत कलमे लागू करण्यास मंजुरी देण्यात आली.
या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात अशा गुन्हेगारी टोळ्यांवरही कठोर आणि कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.