क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
म्हसवड, दि. २ जुलै : माण तालुक्यातील जांभुळणी येथील राजाराम सोमा काळेल यांच्या शेतातील विहिरीवरील कृषी विद्युत वाहिनीचा पोल २० एप्रिल २०२६ रोजी कोसळल्यानंतर संपूर्ण विद्युत वाहिनी तब्बल दोन ते अडीच महिने जमिनीवर पडून होती. या धोकादायक परिस्थितीबाबत संबंधित शेतकरी तसेच जांभुळणीचे उपसरपंच बापूशेठ काळेल यांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र मार्डी येथील आजी-नातवाच्या मृत्यूप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी ६ जुलै रोजी सातारा येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलनाची घोषणा करताच प्रशासनाने तातडीने दखल घेत अवघ्या २४ तासांत नवीन पोल उभारून संपूर्ण विद्युत वाहिनी बदलत वीजपुरवठा सुरळीत केला.
महेश करचे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जांभुळणीतील शेतामध्ये जमिनीवर पडून असलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. शेतकरी, महिला, लहान मुले आणि जनावरे या परिसरातून नियमितपणे ये-जा करत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मार्डीसारखी दुर्दैवी घटना येथेही घडू शकते, अशी चिंता ग्रामस्थांनी वारंवार व्यक्त केली होती. तरीही महावितरण प्रशासनाने जवळपास अडीच महिने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.
मार्डी येथील आजी-नातवाच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि निष्काळजीपणाविरोधात ६ जुलै रोजी सातारा येथे प्रतीकात्मक "तेरावा" आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर महेश करचे यांनी जांभुळणीतील धोकादायक विद्युत वाहिनीचाही मुद्दा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आक्रमकपणे मांडला. त्यांनी तातडीने कारवाईची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महावितरणने नवीन पोल उभारून संपूर्ण विद्युत वाहिनी बदलली आणि वीजपुरवठा पूर्ववत केला.
याबाबत प्रतिक्रिया देताना महेश करचे म्हणाले, "महावितरणला आंदोलनाचा इशारा मिळताच एका दिवसात काम पूर्ण होते, मग दोन-अडीच महिने नागरिकांना हेलपाटे का मारावे लागले? ग्रामस्थांच्या तक्रारींना काहीच किंमत नव्हती का? एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार असेल, तर ही व्यवस्था सामान्य माणसासाठी किती धोकादायक आहे, याचा गंभीर विचार होणे आवश्यक आहे."
ते पुढे म्हणाले, "मार्डीसारखी दुसरी दुर्घटना जांभुळणीत घडली असती, तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार होती? त्यानंतर पुन्हा चौकशी आणि सांत्वनाचेच आश्वासन मिळाले असते का? प्रशासनाने वेळेत जबाबदारी पार पाडली असती, तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही."
महेश करचे यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अखेर काम पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले. मात्र त्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले,
"काम केल्याबद्दल संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. पण हे काम दोन दिवसांत होऊ शकत होते, तर ते दोन-अडीच महिने का रखडले? भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा करून जनतेचा जीव धोक्यात घालण्याचे धाडस करू नका. जनतेच्या जीविताशी खेळणाऱ्यांना यापुढे माफी मिळणार नाही."
ते पुढे म्हणाले, "आमचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही; तो जनतेच्या जीविताच्या सुरक्षेसाठी आहे. शेतकरी जागा झाला, तर महावितरणला लोकशक्तीचा असा शॉक बसेल की निष्काळजीपणा कायमचा बंद होईल. प्रशासनाने आपली जबाबदारी वेळेत पार पाडली, तर आंदोलनाची गरज भासणार नाही. मात्र दुर्लक्ष झाल्यास जनतेच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला मागे-पुढे पाहणार नाही."
महेश करचे यांनी सांगितले की, जांभुळणी येथील विद्युत वाहिनीची तातडीने दुरुस्ती झाल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून अनेक शेतकरी, नागरिक आणि जनावरांचे प्राण वाचले आहेत. मात्र हा प्रश्न केवळ एका गावापुरता मर्यादित नसून माण आणि खटाव तालुक्यात अशा अनेक धोकादायक विद्युत वाहिन्या आहेत. महावितरणने संपूर्ण परिसरातील विद्युत वाहिन्यांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी काळात जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, ६ जुलै रोजी सातारा येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर मार्डी येथील आजी-नातवाच्या स्मरणार्थ प्रतीकात्मक "तेरावा" आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनातून पीडित कुटुंबाला न्याय, दोषींवर कठोर कारवाई आणि संपूर्ण जिल्ह्यातील धोकादायक विद्युत वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे महेश करचे यांनी स्पष्ट केले.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.