⚡ ब्रेकिंग News

केतनला लोहगडावरून ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं? पोलीस तपासात माहिती समोर

हत्येनंतर सियाकडे होता केतनचा मोबाईल; नातेवाईकांना परत करण्यापूर्वी डेटा डिलीट केल्याचा संशय; फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला; 'बसा' हा होता ठरलेला सिग्नल

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

पुणे : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याप्रकरणात तांत्रिक पुराव्यांच्या दृष्टीने आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. लोहगड किल्ल्यावरून ढकलून दिल्यानंतर केतनचा मोबाईल फोन मुख्य आरोपी सिया गोयल हिच्याकडे होता, असा संशय पोलिसांना आहे . सियाने केतनच्या फोनमधील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे .

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी लोहगडावर ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर, केतनचे कुटुंबीय तिथे पोहोचण्यापूर्वी काही काळ केतनचा फोन सियाकडेच होता . नंतर तिने तो फोन केतनच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला . पोलिसांना संशय आहे की, हा फोन हाती लागल्यानंतर सियाने त्यातील चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स किंवा इतर काही डेटा डिलीट केला असावा . या फोनची आता डिजिटल फॉरेन्सिक विश्लेषणासाठी तपासणी केली जात आहे, जेणेकरून डिलीट केलेला डेटा पुन्हा प्राप्त करता येईल का, हे तपासता येईल .

तपास यंत्रणांना आढळले आहे की, सिया आणि चेतन या दोघांनीही आपापसातील अनेक व्हॉट्सॲप चॅट्स, इंस्टाग्राम संभाषणे आणि व्हॉईस नोट्स आधीच डिलीट केल्या होत्या . सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञ आता या डिलीट केलेल्या माहितीचा तपास करत आहेत . आरोपींच्या फोनमधील ही डिलीट केलेली माहिती पुन्हा प्राप्त झाल्यास, या हत्येचा संपूर्ण कट आणि त्यामागील कारणे समोर येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

पोलिसांनी केलेल्या 'क्राइम सीन री-क्रिएशन' आणि चौकशीतून हत्येचे भयंकर नियोजन समोर आले आहे. सिया आणि चेतन यांनी हत्येसाठी आधीच एक 'सिग्नल' (इशारा) ठरवला होता .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जूनच्या सकाळी केतन आणि सिया लोहगड किल्ल्यावर पोहोचले, तेव्हा हुडी घातलेला चेतन आधीपासूनच तिथे दबा धरून बसला होता . तो काही अंतरावरून या दोघांचा पाठलाग करत होता. ते ठरलेल्या निर्जन ठिकाणी पोहोचताच सिया जमिनीवर बसली. हाच त्यांचा ठरलेला सिग्नल होता . सिया जमिनीवर बसताच, चेतनने मागून वेगाने येत केतनला थेट ३५० फूट खोल दरीत ढकलून दिले . पोलिसांच्या माहितीनुसार, चेतनने केतनला ढकलण्यापूर्वीच सियाने केतनचा फोन स्वतःच्या ताब्यात घेतला होता. हा संपूर्ण कट रचण्यासाठी सुमारे ४५ मिनिटांचा वेळ लागल्याचे तपासात समोर आले आहे .

हा खून संपूर्णपणे पूर्वनियोजित होता, हे चेतनच्या एका चालाकीवरून स्पष्ट होते. मोबाईल लोकेशनवरून आपण ट्रॅक होऊ नये म्हणून हत्येच्या दिवशी चेतनने त्याचा स्वतःचा फोन घरीच ठेवला होता . त्याऐवजी, त्याने आपल्या दुकानात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मोबाईल फोन सोबत आणला होता . तसेच, त्याने हत्येनंतर आपले कपडे बदलल्याचेही पोलिसांना आढळले आहे .

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . कोठडी वाढवून मागताना पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, हत्येच्या गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे डिजिटल पुरावे नष्ट करण्यात आले आहेत का, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे . तसेच, केतनचा पासपोर्ट सियाने फाडून जाळल्याचा आरोप आहे, ज्याचे अवशेष अजूनही शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे . पुणे ग्रामीण पोलिसांच्या मते, हा निव्वळ अपघात नसून अत्यंत थंड डोक्याने रचलेला मर्डर प्लॅन आहे . आता फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून केतनच्या फोनमधील डिलीट झालेला डेटा पुन्हा प्राप्त झाल्यानंतर या हत्येमागचे मुख्य कारण आणि इतर मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे .




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...