शब्दाला किंमत की उपेक्षा? शेखर गोरेंच्या उमेदवारीवरून मान तालुक्यात राजकीय खळबळ; कार्यकर्त्यांचा संयम सुटला!
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
सातारा: माण तालुक्याच्या राजकारणात सध्या 'शब्दाला किंमत आहे का?' हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी डावलल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेला त्यांचा राजकीय संघर्ष आणि पक्षश्रेष्ठींकडून मिळालेली आश्वासने यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत.
म्हसवड नगरपरिषद, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरे यांना उमेदवारीबाबत ठोस शब्द दिला होता, असे समर्थकांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या एका जुन्या व्हिडिओमुळे शेखर गोरे हेच स्थानिक पातळीवरील मुख्य चेहरा असतील, अशी खात्री कार्यकर्त्यांना होती. मात्र, ऐनवेळी त्यांची उमेदवारी डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे.
२०१२ पासून सक्रिय राजकारणात असलेल्या शेखर गोरे यांच्या पत्नीने आंधळी जिल्हा परिषद गटातून राज्यामध्ये सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. तरीही, वेळोवेळी शेखर गोरे यांना संघर्षाच्या अग्निपरीक्षेतून जावे लागत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. सोशल मीडियावर सध्या समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली असून, "रामाचा वनवास संपला, पण आमचा संघर्ष का संपत नाही?" असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्याची परिस्थिती ही शेखर गोरे यांच्यासाठी 'अस्तित्वाची लढाई' मानली जात आहे. पक्षश्रेष्ठींनी दिलेला शब्द पाळला नसल्याची भावना निर्माण झाल्याने, शेखर गोरे आता कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कोणती 'वेगळी भूमिका' घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या समर्थकांना विचारात घेऊन शेखर गोरे आगामी काळात कोणता मोठा निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.