म्हसवड धिंड प्रकरणाने तापलेलं वातावरण! अल्पवयीन मुलाची बाजारातून धिंड, पालिकांवर कारवाईची मागणी
इंस्टाग्रामवर हत्यारासह फोटो टाकल्याप्रकरणी 16 वर्षीय मुलावर गुन्हा; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप, न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे पोलिसांच्या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. दीड महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवर हत्यारासह फोटो पोस्ट केल्याच्या आरोपावरून अवघ्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करून त्याची भर बाजारातून धिंड काढल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
नेमकं प्रकरण काय?
नोव्हेंबर 2025 मध्ये म्हसवड पोलिसांनी सहा मुलांना ताब्यात घेत "गरुडा गँग" उघड केल्याचा दावा केला होता. मात्र तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या मुलांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसून त्यांच्यावर कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. ताब्यात घेतलेल्या मुलांपैकी एक 16 वर्षांचा अल्पवयीन मुलगा असून त्याने दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियावर कोयत्यासोबत फोटो टाकला होता. या कारणावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांकडून धिंड काढल्याचा आरोप
या मुलांना म्हसवड बाजारातून फिरवत त्यांची धिंड काढण्यात आली आणि त्याचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अल्पवयीन असतानाही त्याची धिंड काढली, त्याचे नाव जाहीर केले. यामुळे मुलाचे करिअर खराब झाल्याचे सांगत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
पालकांची ओरड
अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "आमच्या मुलाचं नाव सगळीकडे दिलं, त्याची बदनामी केली, त्याचं नाव घालवलं. त्याने कोणाचा खून केला होता का? त्याच्या आयुष्याची बदनामी केली आहे, आयुष्यभरासाठी त्याचं नाव खराब केलं आहे. खेळात त्याची दोन वेळा जिल्हा पातळीवर निवड झालेली, तालुका पातळीवर निवड झालेली. केवळ त्याने दीड वर्षांपूर्वी स्टेटस ठेवला म्हणून पोलिसांनी त्याला अडकवलं आहे. कोयत्या गँगशी त्याचा कधी संबंध आला नाही. अशा लोकांशी संबंध जोडून त्याची धिंड काढली आहे."
पोलीस प्रशासनाची भूमिका
समाजकार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास उद्यापासून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल उद्यापर्यंत मागवून घेण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेतं आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.