'महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील'; मुख्यमंत्र्यांच्या मौनावर प्रश्न; 'काल झाड, आज मॅनहोल' वक्तव्याने वाद उग्र
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई : मुंबईतील सलग मुसळधार पावसाने जीवितहानीच्या घटनांना उधाण दिले आहे. चेंबूरमध्ये झाड कोसळून शाळेच्या बसवर ११ वर्षीय मुलाचा मृत्यू आणि साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत – या घटनांनी मुंबईकर हादरले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ते याच घटनांचा उल्लेख करताना हसताना दिसत आहेत . या असंवेदनशीलतेने संतापलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे
विधान भवन परिसरात २ जुलै रोजी काढलेल्या या व्हिडिओमध्ये अमित साटम राष्ट्रवादी (सप) आमदार जयंत पाटील यांच्याशी बोलताना दिसतात. ते म्हणतात, "काल झाड, आज मॅनहोल" – हा उल्लेख चेंबूरमधील झाड कोसळण्याची आणि साकीनाका मॅनहोलच्या दुर्घटनेचा आहे . या वक्तव्यादरम्यान साटम यांच्या चेहऱ्यावर हास्य होते .
या व्हिडिओने राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडवली आहे. विरोधी पक्षांनी याला 'असंवेदनशीलता' आणि 'मृतांचा अनादर' म्हटले आहे .
राज ठाकरे यांनी या प्रकरणी फेसबुक पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष्य केले. त्यांनी सुरुवातीला भाजपच्या केंद्रीय नेत्यांवर टीका करताना म्हटले, "भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत... पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे?"
त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा हवाला देत म्हटले, "देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन-अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक साऱ्या देशात होतं! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय, हे आता स्पष्टपणे जाणवत आहे."
राज ठाकरे पुढे म्हणाले, "तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये."
त्यांनी 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' या इंग्रजी वाक्याचा हवाला देत म्हटले, "या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भाजपचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही, यामुळे सगळे बेफाम झाले आहेत."
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मौनाला प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत, असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेव्हा होतात आणि त्यावर जेव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेव्हा मात्र तुमच्या संवेदनशीलतेबद्दल शंका घ्यावी लागते."
त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा उल्लेख करताना म्हटले, "मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली, तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय, असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे, अशी देशभर प्रतिमा होती."
राज ठाकरे पुढे म्हणाले, "आज तुम्ही हा आपला आहे, ना? मग त्यांनी काहीही केलं, तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात, असं वाटत नाहीये का?"
त्यांनी स्पष्ट केले की, फडणवीस यांनी बोलले असते, तर अमित साटम यांना पुन्हा अशी चूक करण्याची हिंमत झाली नसती. त्यांच्या मौनामुळेच हे प्रकार वाढत आहेत.
"तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात, त्यांना तुम्ही काही बोलत नाही. तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?" असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
शेवटी त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले, "तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. तो कुठल्या का पक्षाचा असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ, इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील."
राज ठाकरे यांच्या या आक्रमक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे अमित साटम यांच्या व्हिडिओवरून विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे , तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर 'स्वकीयांना पाठिंबा' देण्याचा आरोप होत आहे. मुंबईतील पावसाचा कहर आणि प्रशासकीय निष्काळजीपणा या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे . आता फडणवीस यांच्याकडून या प्रकरणी काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.