"हा रस्ता माझ्या एकट्याच्या बापाचा नाही..."; मराठी अभिनेता शशांक केतकर खवळला, थेट पुरावा देतच केली आगपाखड (VIDEO)
मुंबईतील रस्ते, खड्डे आणि उघड्या गटारांचा मुद्दा पकडत शशांकचा सरकारवर टीकास्त्र; म्हणाला, "आपल्या देशात जीवाची किंमत शून्य"
मुंबई : 'होणार सून मी ह्या घरची', 'मुरांबा' यासारख्या मालिका-चित्रपटांमधून प्रेक्षकांचा लाडका झालेला अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा सामाजिक मुद्द्यांवरून चर्चेत आला आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करत मुंबईतील रस्ते, खड्डे आणि उघड्या गटारांचा मुद्दा पकडत प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.
शशांकने 'मड आयलंड' परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था दाखवत सरकारवर ताशेरे ओढले. तो म्हणाला, "या देशातील रस्ते, रस्त्यांची एकंदर परिस्थिती हा फारच गमतीशीर विषय आहे. मला त्याबद्दल कायमच बोलायला आवडतं. कारण हा देश माझा आहे. या देशातील रस्ते माझे आहेत."
व्हिडीओमध्ये शशांकने त्याच्यावर टीका करणाऱ्या मित्रांनाही सुनावले. तो म्हणाला, "मित्रांनो या रस्त्यावरती फक्त मी एकटा गाडी चालवणार नाही. कारण हा रस्ता माझ्या एकट्याच्या बापाचा नाही. तुमच्याही बापाचा नाही. हा आपल्या देशाचा रस्ता आहे. उद्या माझी गाडी त्या खड्ड्यामध्ये गेली, माझ्या गाडीचं नुकसान झालं तसं तुमच्याही गाडीचं नुकसान होऊ शकतं."
प्रशासनाला थेट सवाल
शशांकने मड आयलंड रस्त्यावरील ड्रेनेजच्या लोखंडी झाकणांचा मुद्दा उपस्थित केला. तो म्हणाला, "जो तयार झालेला रस्ता आहे, त्यामध्ये ड्रेनेजला लोखंडी झाकणं लावलेली आहेत. ती इतकी ताकदवान आहेत की, ट्रक सोडाच पण सायकल त्याच्यावरुन गेली तरी तुटतील. मागच्या दीड आठवड्यांपासून या ड्रेनेजची अवस्था अशीच आहे."
तो पुढे म्हणाला, "महानगरपालिकेला माझी विनंती आहे की आमचं जे काही डॅमेज होईल, ते भरण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. एखादा बाईक चालवणारा तिथून गेला, तर त्याच्या जीवाची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का?"
व्हिडीओ शेअर करताना शशांकने लिहिले, "Highway असो वा शहरातला, गावातला छोटा रस्ता… प्रवास करणारा जिवंत माणूस असतो. अनेक चालक नियम पाळत नाहीत मान्य आहे पण या अशा उघड्या गटारांचं काय करायचं? शेवटी आपल्या देशात आपल्या जीवाची किंमत शून्य आहे याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येतो."
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.