मुंबई : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी भाजपकडून पोलिसी बळाचा वापर केल्याच्या आरोपानंतर निर्माण झालेल्या वादात शिवसेनेने कडक भूमिका घेतल्याने शेवटी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी विधानमंडळात आक्रमक भूमिका घेतली होती. शंभुराज देसाई यांनी सभागृहात सांगितले की, १० पोलिसांनी त्यांना हातापायाला आणि कमरेला पकडून खेचले. यानंतर विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी थेट तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. शिवसेनेच्या आमदारांनी विधानमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजीही केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराने नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही नाराजी बोलून दाखवली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी खमकी भूमिका घेत जयकुमार गोरे आणि तुषार दोशी यांच्या कृतीवर बोट ठेवले. शंभुराज देसाई यांनी शिंदे यांना सांगितले की, सत्ताधारी महायुतीत असे पुन्हा होऊ नये यासाठी कठोर भूमिका घ्यावी.
शिंदेंनी फडणवीसांना नेमके काय सांगितले?
अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर संपूर्ण प्रकार मांडला. शिवसेनेच्या मंत्र्यांनीही शिंदे यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली की, “पोलिसांवर कारवाई होत नसेल आणि मंत्र्यांनाच धक्काबुक्की होत असेल तर मंत्री म्हणून राहून काय फायदा?”
त्याच रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांची नाराजी स्पष्टपणे सांगितली आणि म्हटले, “जर असेच चालले तर सत्ताधारी नेते आणि मंत्र्यांवर पोलिसांची दडपशाही राहील. यावर तातडीने निर्णय घ्यावा.”
अधिवेशन संपल्यानंतर शिंदे, शंभुराज देसाई आणि दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन पुन्हा नाराजी व्यक्त केली. यावर फडणवीस यांनी “लोकप्रतिनिधीचा मान-सन्मान ठेवला जाईल” असे आश्वासन दिले आणि तीन-चार दिवसांत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
शेवटी, शिवसेनेच्या सततच्या नाराजीमुळे आणि महायुतीतील वाद वाढू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामागे भाजपला सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील इतर निवडीत दोन्ही पक्षांची साथ मिळावी आणि पुन्हा गोंधळ होऊ नये, हा हेतूही असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणामुळे महायुतीतील संबंध ताणले गेले होते, मात्र तुषार दोशींना रजेवर पाठवून फडणवीस सरकारने शिवसेनेची नाराजी शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.