वयाच्या ८९ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने घेतला अखेरचा श्वास; राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी
नागपूर: माजी मंत्री, ज्येष्ठ नेते आणि विदर्भातील अजरामर व्यक्तिमत्त्व दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांचे वडील होते.
दत्ता मेघे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपमध्ये काम करत त्यांनी चार वेळा लोकसभा खासदार म्हणून नागपूर, रामटेक व वर्धा या तीन मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. विदर्भातील तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते होतात.
काँग्रेस सरकारमध्ये नागपूरचे पालकमंत्री
दत्ता मेघे यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषवली. काँग्रेसचे सरकार असताना ते नागपूरचे पालकमंत्री होते. याशिवाय ते राज्याचे विरोधी पक्षनेते, राज्यसभा सदस्य तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले.
शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय
दत्ता मेघे यांनी राजकारणाबरोबरच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. नागर युवक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तसेच 'दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स' सारख्या संस्थांच्या उभारणीतून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण व आरोग्य सुविधा पोहोचवल्या. त्यांच्या या कार्यामुळे विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. विदर्भ राज्याच्या मागणीचे ते समर्थक म्हणूनही ओळखले जात होते.
दत्ताभाऊ माझ्या ज्येष्ठ बंधूंसारखे : गडकरी
दत्ता मेघे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले, "ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आणि माझ्या ज्येष्ठ बंधूंसारखे असलेले दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. दत्ताभाऊंच्या जाण्याने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे."
दत्ता मेघे यांच्या पश्चात त्यांचे पुत्र व हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्यासह मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीही राजकारणात सक्रिय असून समीर मेघे यांनी वडिलांची राजकीय परंपरा पुढे चालवली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.