दिघंचीत मटका व्यवसायाचा सुळसुळाट; वारंवार तक्रारी करूनही कारवाई का नाही?
दिघंची- विशेष प्रतिनिधी
दिघंचीमध्ये अवैध मटका व्यवसायाचा सुळसुळाट झाल्याचा आरोप होत असून, वारंवार बातम्या प्रसिद्ध करून आणि आटपाडी पोलीस प्रशासनाकडे तोंडी तक्रारी करूनही या व्यवसायावर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
दिघंचीतील बसस्थानक परिसरात सुरू असलेले मटक्याचे केंद्र, दिघंची विकास सोसायटीच्या पंपासमोर हायवे लगत सुरू असलेला आकडे घेण्याचा व्यवसाय आणि गावात जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असल्याचा आरोप असलेला मटका व्यवसाय, अशा विविध ठिकाणी हा प्रकार उघडपणे सुरू असल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, पंढरपूर-मल्हारपेठ या प्रमुख मार्गावरच हे व्यवसाय सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दिघंची पोलीस आउटपोस्टमध्ये नियुक्त असलेले कर्मचारी याच मार्गावरून नियमित ये-जा करत असताना त्यांच्या निदर्शनास हे प्रकार येत नाहीत का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या अवैध व्यवसायाबाबत तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे मटका व्यवसाय चालवणाऱ्यांचे धाडस वाढले आहे का? त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
काही नागरिकांकडून या व्यवसायाला स्थानिक पातळीवर अभय मिळत असल्याचे तसेच कारवाई केवळ दाखवण्यापुरती केली जात असल्याचे आरोप केले जात आहेत. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करणे गरजेचे आहे.
एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे अवैध व्यवसायांमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाकडून अवैध धंद्यांना आळा घालण्याचे आवाहन केले जात असताना स्थानिक पातळीवर मात्र ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र समोर येत आहे.
आता प्रश्न एवढाच आहे की, आटपाडी पोलीस प्रशासन दिघंचीतील या कथित मटका व्यवसायावर प्रत्यक्ष कारवाई कधी करणार? वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करणार का? की तक्रारी आणि बातम्या केवळ कागदावरच राहणार?**
दिघंचीतील अवैध मटका व्यवसायावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.