जळव घाटात भाविकांनी भरलेले वाहन नियंत्रणाबाहेर, ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
सातारा : राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असतानाच सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाटण तालुक्यातील निवकणे येथील जानाई देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची पिकअप गाडी जळव घाटात पलटी झाली. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर १० भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
जखमींना ग्रामस्थांची मदत
अपघाताची माहिती मिळताच जळव आणि परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तात्काळ मदत व बचावकार्य सुरू केले. जखमी भाविकांमध्ये तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी सातारा येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
प्राथमिक माहितीनुसार, वाहनाचे नियंत्रण चालकाच्या हातून सटकल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी पोलिसांनीही दाखल होऊन मदतकार्य सुरू केले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; पोलिस पुढील तपास करीत आहेत.
जानाई देवीच्या यात्रेचे महत्त्व
निवकणे हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डोंगर दरीत वसलेले जानाई देवीचे मूळ स्थान असून ते भाविकांचे जागृत श्रद्धास्थान मानले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीनंतर जेजुरी येथून जानाई देवीचा पालखी सोहळा निवकणे येथे येतो. या पार्श्वभूमीवर ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आता या यात्रेप्रमाणेच जेजुरी येथेही देवीची यात्रा भरविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.