हॉर्मुजच्या सामुद्रधुनीत भारताकडे येणाऱ्या जहाजावर इराणचा हल्ला; दोन भारतीयांचा मृत्यू, एक बेपत्ता
गुजरातमधील कांडला बंदराकडे येत असलेल्या 'मयुरी नारी' या थायलंडच्या कार्गो जहाजाला इराणकडून लक्ष्य; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली तीव्र चिंता, इराणचा दावा- इशारा दुर्लक्षित केल्याने हल्ला
नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हॉर्मुजच्या सामुद्रधुनीत एका भारतगामी जहाजावर झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. थायलंडचे 'मयुरी नारी' हे कार्गो जहाज गुजरातमधील कांडला बंदराकडे येत असताना त्यावर इराणने हल्ला केला. या हल्ल्यात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, "11 मार्च रोजी हॉर्मुज सामुद्रधुनीत थायलंडच्या 'मयुरी नारी' या कार्गो जहाजावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. भारत सरकार या घटनेचा तीव्र निषेध करते. व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे टाळले पाहिजे. या युद्धामुळे निर्दोष नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे."
इराणचा दावा काय?
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. IRGC च्या मते, काही जहाजांनी इराणचा इशारा दुर्लक्षित करून हॉर्मुज सामुद्रधुनीत प्रवेश केला होता. इराणने केलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. IRGC चे नेव्ही कमांडर अलिरेजा तंगसिरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या मार्गाने जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला इराणची परवानगी आवश्यक असल्याचा इशारा दिला आहे.
तणावाची परिस्थिती
दरम्यान, इराणी सैन्याच्या ऑपरेशनल कमांडने सरकारी टीव्हीवर घोषणा करत अमेरिका, इस्रायल किंवा त्यांच्या सहयोगींशी संबंधित जहाजांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा दिला आहे. तसेच हॉर्मुज सामुद्रधुनीतून एक थेंबही तेल जाऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की इराणमध्ये सध्या सुमारे 9 हजार भारतीय नागरिक आहेत. काहींनी भारत सरकारच्या सल्ल्यानुसार स्वदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अजूनही अनेक भारतीय तिथेच असून भारतीय दूतावास त्यांच्याशी सतत संपर्कात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.