⚡ ब्रेकिंग News

'बाईपण भारी देवा'नंतर केदार शिंदेंचा आणखी एक स्त्रीप्रधान सिनेमा; 'आई भाड्याने हवी?' ची दणक्यात घोषणा


'बाईपण भारी देवा'नंतर केदार शिंदेंचा आणखी एक स्त्रीप्रधान सिनेमा; 'आई भाड्याने हवी?' ची दणक्यात घोषणा

राजकुमार हिरानी शैलीची झलक देणारा विनोद आणि भावनांचा संगम; जून-जुलैमध्ये सुरू होणार चित्रीकर

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा शिंदे यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'अगंबाई…अरेच्चा!', 'बाईपण भारी देवा' आणि 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या यशस्वी चित्रपटांनंतर आता 'आई भाड्याने हवी?' या नव्या चित्रपटाद्वारे ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा व लेखन वैशाली शशी नाईक आणि ओंकार वसुंधरा दत्त यांनी केले आहे. छायांकन व संकलन मयुर संजिवनी हरदास यांचे आहे. विशेष म्हणजे 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' नंतर निर्माती सना शिंदे, दिग्दर्शक केदार शिंदे, लेखिका वैशाली शशी नाईक आणि लेखक ओंकार वसुंधरा दत्त ही चौकडी पुन्हा एकत्र आली आहे. यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.

स्त्रीप्रधान विषय हाताळणे आव्हानात्मक : केदार शिंदे

दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "स्त्रीप्रधान विषय हाताळणे ही नेहमीच जबाबदारीची आणि आव्हानात्मक गोष्ट असते. जोपर्यंत एखादी कथा मनापासून भिडत नाही, तोपर्यंत अशा चित्रपटाची सुरुवात करायची नाही, असा माझा ठाम निर्धार होता. 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' आणि 'आई भाड्याने हवी?' या दोन्ही चित्रपटांचे काम २०२३ पासून सुरू झाले. 'आई भाड्याने हवी?' हा चित्रपट मी ज्यांना आदर्श मानतो, त्या राजकुमार हिरानी यांच्या शैलीची झलक देणारा आहे. हा केवळ विनोदी चित्रपट नसून 'आई' या नात्याचा गाभा मांडणारा, मनाला स्पर्श करून जाणारा अनुभव आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला लावणे हे माझे ध्येय असते आणि या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवेल."

आई भाड्याने हवी?' हा पूर्णपणे मनोरंजनप्रधान : सना शिंदे

निर्मात्या सना शिंदे यांनी सांगितले, "पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे या नव्या चित्रपटाबद्दलही तितकीच उत्सुकता आहे. पहिला चित्रपट भावनिक अंगाने साकारण्यात आला होता, तर 'आई भाड्याने हवी?' हा पूर्णपणे मनोरंजनप्रधान, रंगतदार आणि मल्टीस्टारर आहे. यात नातेसंबंध, भावना आणि विनोद यांचा सुरेख संगम असेल. मला वैयक्तिकरित्या स्त्रीकेंद्री कथा आवडतात, त्यात 'आई' ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सक्षम आणि प्रभावी व्यक्तिरेखा असते. प्रेक्षकांना आशयघन आणि मनाला भिडणारे चित्रपट देण्याचा आमचा प्रयत्न कायम असतो."

शीर्षकातूनच कुतूहल निर्माण करणारा हा चित्रपट आजच्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेत 'आई' या नात्याची गरज, त्याची उणीव आणि त्यामागची भावनिक पोकळी यावर हलक्या फुलक्या पद्धतीने भाष्य करणार आहे. सध्या कलाकारांची निवड सुरू असून, जून-जुलैमध्ये चित्रीकरणाला सुरुवात होईल. या ‘आई’च्या शोधाची कथा नेमकी कशी उलगडते, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...