काँग्रेसच्या तुलनेत एक लिटर पेट्रोलवर मोदी सरकार किती टॅक्स लावते? खासदाराने आकडेवारीच मांडली
दीपेंद्र हुड्डा यांचा मोदी सरकारवर निशाणा; 'सिलेंडर नव्हे तर सरेंडर संकट' असल्याचा आरोप, शेतकरी कर्जमाफीचाही मुद्दा
नवी दिल्ली: लोकसभेत अर्थ विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पेट्रोल आणि डिझेलवरील कराच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या काळातील कर आणि आत्ताच्या कराची आकडेवारी मांडत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
पेट्रोल-डिझेलवरील करात मोठी वाढ
हुड्डा यांनी सांगितले की, काँग्रेसच्या काळात पेट्रोलवर प्रतिलिटर सुमारे ९ रुपये एक्साइज ड्युटी आकारली जात होती, तर डिझेलवर सुमारे ३.५ रुपये कर होता. तर सध्या मोदी सरकारच्या काळात पेट्रोलवर प्रतिलिटर सुमारे २३ रुपये आणि डिझेलवर २१ रुपये एक्साइज ड्युटी आकारली जात आहे. या वाढलेल्या करांवरून काँग्रेसने सरकारला धारेवर धरल्याचे दिसून आले.
शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा
काँग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही सरकारला लक्ष्य केले. देशातील शेतकऱ्यांवर सुमारे ३२ लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे ते म्हणाले. त्यावर सरकारकडे कर्जमाफीसाठी कोणतीही योजना नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्याउलट, कॉर्पोरेट्सचे सुमारे १६ लाख कोटी रुपये माफ केल्याचा दावाही हुड्डा यांनी केला.
सिलेंडर संकट' की 'सरेंडर संकट'?
सरकारवर निशाणा साधताना हुड्डा यांनी ट्विस्ट देऊन म्हटले की, देशात केवळ 'सिलेंडर संकट' नाही, तर 'सरेंडर संकट' देखील आहे. भारताचे अनेक आर्थिक निर्णय बाह्य दबावाखाली घेतले जात असल्याचे दिसते, असा टोला त्यांनी लगावला.
रुपयाच्या घसरणीवर सवाल
भारतीय रुपयाच्या घसरणीवरही दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी प्रश्न उपस्थित केला. इराण आणि लेबनानसारख्या युद्धग्रस्त देशांच्या चलनासोबत रुपयाची तुलना करताना ते म्हणाले, "रुपयाची इतकी घसरण व्हायला भारतावर कोणता बॉम्ब पडला आहे?" तसेच, देशातील संपत्तीतील विषमतेकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, देशातील १% लोकांकडे ४०% संपत्ती आहे, तर ५०% लोकांकडे केवळ ३% संपत्ती आहे.
हुड्डा यांच्या या आरोपांनंतर सरकारकडून यावर काय उत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.