'देवाच्या प्लॅनचा नवा चॅप्टर'; रिंकू सिंगवर उपकर्णधारपदाची जबाबदारी, अजिंक्य रहाणेकडेच कर्णधारपद कायम
नवी दिल्ली: इंडियन प्रीमिअर लीगचा १९ वा हंगाम २८ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सने मोठा निर्णय घेतला आहे. शाहरुख खानचा लाडका खेळाडू रिंकू सिंग याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फ्रँचायझीने 'नाइटस इनप्लग्ड ३.०' या कार्यक्रमात याची अधिकृत घोषणा केली.
रिंकू सिंगकडे उपकर्णधारपदाची धुरा
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या हंगामात केकेआरची कामगिरी खराब झाली होती, तरीही फ्रँचायझीने यावेळीही अजिंक्य रहाणेकडेच नेतृत्व कायम ठेवले आहे. आता रिंकू सिंगची उपकर्णधारपदी निवड करून संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.
रिंकू सिंग २०१८ पासून कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५९ सामन्यांत ३०.५२ च्या सरासरीने आणि १४५.१७ च्या स्ट्राइक रेटने १०९९ धावा केल्या आहेत.
फ्रँचायझीकडून भावूक पोस्ट
केकेआरने एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना भावूक शब्दांत लिहिले की, "देवाच्या प्लॅनचा नवा चॅप्टर." केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर यांनी प्री-सीझन इव्हेंटमध्ये ही घोषणा करताना सांगितले की, रिंकू सिंगला टीमचा व्हाइस कॅप्टन करण्याची घोषणा करताना फ्रँचायझीच्या सर्वांना आनंद होत आहे.
अलिगढ़च्या रिंकूची स्टारपर्यंतची वाटचाल
रिंकू सिंग हा उत्तर प्रदेशातील अलिगढ़ येथील रहिवासी आहे. २०१८ मध्ये केकेआरने त्याला ८० लाख रुपयांमध्ये संघात घेतले होते. २०२५ मध्ये फ्रँचायझीने त्याला १३ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले. आयपीएल २०२३ मध्ये त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये सलग ५ षटकार मारले होते, तेव्हा तो रातोरात स्टार झाला आणि त्याच्यासाठी भारतीय संघाची दारे उघडली.
रिंकू सिंगने भारतासाठी आतापर्यंत दोन वनडे आणि ४५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. टी२० विश्वचषक २०२६ जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता.
मुख्य प्रशिक्षकाचे समर्थन
कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी रिंकू सिंगला उपकर्णधार करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, "रिंकूचे नेतृत्व गेल्या काही वर्षांपासून विकसित होताना पाहत आहे. टीमलाही रिंकू सिंगकडून अपेक्षा आहेत, यामुळे त्याला जबाबदारी देण्याचा विचार होता. टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर हा निर्णय एकदम योग्य वेळेत झाला आहे."
आयपीएलच्या नव्या हंगामात रिंकू सिंग उपकर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.