⚡ ब्रेकिंग News

अशोक खरातचं हादरवणारं दुबई कनेक्शन! हवाला रॅकेट चालवून परदेशात काळा पैसा पाठवल्याचा धक्कादायक खुलासा

नामवंत भक्त, बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने चालत होता आंतरराष्ट्रीय हवाला व्यवहार; SIT ला मिळाले सबळ पुरावे

नाशिक: स्वयंघोषित ‘कॅप्टन’ आणि भोंदू बाबा अशोक खरात याच्या गुन्ह्यांची व्याप्ती आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) तपासात खरात मोठ्या प्रमाणावर हवाला रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परदेशात, विशेषतः दुबई पर्यंत बेकायदेशीरपणे पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी तो हवाल्याचा वापर करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतातून दुबईला आणि दुबईहून भारतात मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर खरातच्या माध्यमातून होत होती. यासाठी त्याने काही खासगी एजंट्स आणि बेकायदेशीर मार्गांचा वापर केल्याचे SIT ला मिळालेल्या पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. या व्यवहारांमध्ये परकीय चलन विनिमय कायद्याचे (FEMA) उल्लंघन झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बडे भक्त आणि अधिकाऱ्यांचे ‘कवच’ 

खरातचे हे काळे धंदे सुरळीत चालण्यासाठी त्याला काही बड्या राजकीय नेत्यांचा, वजनदार भक्तांचा आणि भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांचा पाठिंबा होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. याच पाठबळामुळे इतक्या मोठ्या स्तरावर हा आर्थिक गुन्हा राजरोसपणे सुरू होता.

SIT च्या हाती लागलेले पुरावे

विशेष तपास पथकाला खरातच्या कार्यालयातून डायऱ्या, डिजिटल पुरावे, बँक ट्रान्झॅक्शन्स आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज मिळाले आहेत. या पुराव्यांवरून हा आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याचे दिसून येत आहे. प्रकरणाची गंभीरता पाहता सक्तवसुली संचालनालय (ED) देखील लवकरच हस्तक्षेप करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

तक्रारींचा ओघ वाढला

अशोक खरातविरोधात लैंगिक शोषण, फसवणूक आणि इतर गुन्ह्यांच्या तक्रारींचा सिलसिला सुरूच आहे. SIT च्या हेल्पलाइनवर आतापर्यंत १०० पेक्षा जास्त तक्रारी आल्या असून, त्यातील सुमारे ७० टक्के तक्रारदार महिला आहेत. मात्र, अनेक महिला फोनवर माहिती देतात पण लेखी तक्रार देण्यास कचरतात. खरातची दहशत आणि सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे हे घडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

SIT अधिकारी आता तक्रारदारांशी संपर्क साधून त्यांना पूर्ण सुरक्षिततेची हमी देत आहेत आणि लेखी तक्रारीसाठी प्रोत्साहन देत आहेत, जेणेकरून भोंदू बाबाविरोधात अधिक सबळ पुरावे गोळा करता येतील.

पार्श्वभूमी

अशोक खरातविरोधात आतापर्यंत अनेक FIR दाखल झाल्या आहेत. यामध्ये महिलांचे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, जादूटोणा आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. SIT सध्या खरातच्या मालमत्ता, पैशाचा स्रोत आणि त्याच्या नेटवर्कचा सखोल तपास करत आहे.


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...