"पाठीत खंजीर खुपसणे आम्हाला जमत नाही, छातीला छाती भिडवायची" - शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा भाजप आमदार श्वेता महालेंना खडा इशारा
चिखली (बुलढाणा): महायुतीतील दोन आमदारांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आमदार श्वेता महाले यांच्यावर अत्यंत आक्रमक आणि खालच्या भाषेत टीका केली आहे.
"माहिती अधिकाराचा वापर करून दबाव टाकण्याचे 'हिजडे' धंदे मी करत नाही, ते कोण करतंय हे तुमच्या घरात चौकशी करा," अशा शब्दांत गायकवाड यांनी श्वेता महालेंवर घणाघाती हल्ला चढवला.
नेमकं प्रकरण काय?
चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असताना, भाजप आमदार श्वेता महाले यांनी संजय गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गायकवाड हे माहिती अधिकार (RTI) चा धाक दाखवून आणि सरपंचांवर दबाव टाकून पक्षात प्रवेश घेत असल्याचा दावा महालेंनी केला होता. याला उत्तर देताना गायकवाड यांनी पूर्णपणे आक्रमक भूमिका घेतली.
संजय गायकवाड म्हणाले,
"आमचे काम सरळ आहे. छातीला छाती भिडवायची आणि विषय संपवायचा. पाठीत खंजीर खुपसणे आम्हाला जमत नाही. चिखलीच्या आमदार म्हणतात की मी RTI टाकून दबाव आणतोय, पण असे धंदे मी कधीच करत नाही. हे कोण करतंय, याची तुम्ही तुमच्या घरातच चौकशी करा."
ते पुढे म्हणाले,
"आम्ही चिखलीत आमचा पक्ष वाढवण्यासाठी आणि खासदारांचे मताधिक्य वाढवण्यासाठी आलो आहोत. चिखलीत माझे असंख्य नातेवाईक आहेत, पण माझ्याबद्दल चांगल्या पोस्ट केल्यावर त्यांना धमकावले जाते. आमच्या शिवसैनिकांनी भाजप आमदाराला पाच-सहा वेळा निवडून आणले आहे. आता आमचे कार्यकर्ते काम घेऊन गेले की त्यांना 'पक्षात प्रवेश घ्या' असे सांगितले जाते. शिवसेना चिरडायला निघत असाल, तर तो त्रास दूर करायला आम्ही आलो आहोत."
जेलमध्ये टाकण्याची धमकी?
गायकवाड यांनी थेट आव्हान देत म्हटले,
"कोणाला जेलमध्ये घालणार आणि कोणाला धमकावणार, हे आता आम्ही पण पाहणार आहोत. चिखलीच्या आमदार काय करतात, हे सर्व आमच्या कानावर आहे. मी काही घरात बसलेला आमदार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात माझे नाव आहे."
चिखलीत महायुतीमधील हा अंतर्गत कलह दिवसेंदिवस विकोपाला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही आमदारांमधील शाब्दिक युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.