“मला आधी माहिती नव्हती, आता कळालं की तो भोंदूबाबा आहे... अशा लोकांना ठोकून काढले पाहिजे” - दत्तात्रय भरणे
नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा अशोक खरात प्रकरणातील सूर पूर्णपणे बदलला आहे. सुरुवातीला रुपाली चाकणकर यांची ठामपणे पाठराखण करणारे भरणे यांनी आता अशोक खरात यांना ‘भोंदूबाबा’ म्हणत कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दत्तात्रय भरणे यांनी आपली भूमिका बदलल्याचे स्पष्ट दिसून आले.
“आम्ही कुठल्याही महाराज आणि बुवाबाजीच्या विरोधात आहोत. अजितदादांनी आम्हाला तशी शिकवण दिली आहे. आम्ही भोंदूबाबांना कधी जवळ केले नाही. अशोक खरात कोण आहे हे मला माहिती नव्हते. या लोकांना ठोकून काढले पाहिजे, जेणेकरून दुसरा कोणताही महाराज अशी चूक करणार नाही,” असे दत्तात्रय भरणे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मी आधी जेव्हा बोललो होतो तेव्हा मला अशोक खरात यांच्याबाबत जास्त माहिती नव्हती. एकंदर प्रकरण माहिती नव्हते. नंतर कळाले की तो भोंदूबाबा आहे. अशा लोकांना वेगळ्या प्रकारे ठोकून काढले पाहिजे. महाराष्ट्रात चांगले महाराजही आहेत, पण १०० पैकी एखादवेळा अशी गोष्ट घडते आणि तेच वाजवले जाते.”
भरणे यांनी स्पष्ट केले की, “खरात अत्यंत चुकीचा माणूस असून त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मी खरात याची बाजू कधीच घेणार नाही.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगत भरणे म्हणाले, “चौकशीत जे बाहेर येईल ते समजेल. दोषींवर कारवाई होईल. राज्यात अंधश्रद्धा कायद्याची अंमलबजावणी व्हायला हवी.”
आधी काय म्हणाले होते?
प्रकरण उघडकीला आल्यानंतर सुरुवातीला दत्तात्रय भरणे यांनी रुपाली चाकणकर यांची पुरेपूर पाठराखण केली होती. “रुपाली चाकणकर यांची कुठलीही चूक नाही. आपण कोणाला गुरू मानतो. कुठे कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असतील, दर्शन घेतले असेल. यात त्यांची चूक काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
आता मात्र पूर्णपणे उलट सूर घेत भरणे यांनी अशोक खरात यांना भोंदूबाबा म्हणत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.