"लहानपणापासून भुकेचे चटके सोसले, संघर्ष केला..." राज्यसभा उमेदवारी मिळताच ज्योती वाघमारेंनी व्यक्त केल्या भावना
दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले
राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी मिळालेल्या ज्योती वाघमारे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लहानपणापासून भुकेचे चटके सोसले, संघर्ष केला, अशा पार्श्वभूमीतून आपण राज्यसभेवर जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कुठल्याही पद्धतीचे आरक्षण नसताना दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचत असल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
ज्योती वाघमारे काय म्हणाल्या?
उमेदवारी मिळाल्यानंतर भावुक झालेल्या ज्योती वाघमारे म्हणाल्या, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार. मला वाटलं नव्हतं की कधी हा दिवस येईल. कारण लहानपणापासून भाकरीचा संघर्ष बघितला. लहानपणापासून भुकेचे चटके सोसले. लहानपणापासून संघर्ष केला."
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, "त्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा वाटले की यापेक्षा मोठा काहीही होऊ शकत नाही. परंतु शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जसं म्हणायचे की, शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म. आज कुठल्याही पद्धतीचे आरक्षण नसताना माझ्यासारखी दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचते आहे, त्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार."
पार्श्वभूमी:
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिंदे सेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत शेवटपर्यंत उत्सुकता होती. अखेर शिंदे सेनेने ज्येष्ठ नेत्यांना डावलत ज्योती वाघमारे यांना संधी दिली. राज्यातील सात जागांसाठी सातच उमेदवार असल्याने निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.