पायाची शस्त्रक्रिया केली अन् अभिनेत्याचा जीव गेला; १२ वर्षांनी ५ डॉक्टर गोत्यात, नेमकं प्रकरण काय?
अपघातानंतर निष्काळजीपणामुळे झाला मृत्यू; वीजपुरवठा खंडित, रक्तस्त्राव, वैद्यकीय नोंदी नष्ट केल्याचा आरोप; कुटुंबीयांच्या लढ्यानंतर अखेर गुन्हा दाखल
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये जुनियर आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या अभिनेता सलमान बाबर शाहच्या मृत्यूप्रकरणी १२ वर्षांनंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पाच डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाजीनगर परिसरातील दोन रुग्णालयांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप आहे.
अभिनेत्याच्या आईने न्यायासाठी केलेल्या दीर्घ लढ्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संबंधित डॉक्टरांच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमानच्या आई नसीम शाह यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. एप्रिल २०१४ मध्ये शूटिंगवरून परतताना सलमानला टेम्पोची धडक बसली होती. त्यानंतर त्याला वसईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत त्याच्या पायाला फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले आणि शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला.
पाच डॉक्टरांवर गुन्हा
या प्रकरणात शिवाजीनगर येथील मिलेनियम रुग्णालयातील डॉ. नियाझ अहमद खान, डॉ. इम्तियाज अहमद खान आणि डॉ. उमेश पिंपळे यांच्यासह चेंबूर येथील साई ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधील डॉ. खालिद आणि डॉ. अमित शोभावत यांचा समावेश आहे.
शस्त्रक्रियेदरम्यान वीजपुरवठा खंडित
एफआयआरनुसार, अपघातानंतर सलमानवर उपचार करण्यात आले; मात्र उपचारात झालेल्या त्रुटी, उशीर आणि शस्त्रक्रियेनंतर योग्य वैद्यकीय देखरेख न मिळाल्याने त्यांची प्रकृती बिघडत गेली.
घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
वसईतील रुग्णालयातील डॉक्टरांनी जवळच्या मिलेनियम रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी जाण्याचा सल्ला दिला
त्यानुसार कुटुंबीयांनी सलमानला तेथे दाखल केले
शस्त्रक्रिया सुरू असतानाच रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित झाला
शस्त्रक्रियेनंतर अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले
पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवल्यानंतर तेथे रक्त चढवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला
वैद्यकीय नोंदी नष्ट केल्याचा आरोप
त्या वेळी वैद्यकीय नोंदींमध्ये मृत्यू नैसर्गिक असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच शवविच्छेदनही करण्यात आले नव्हते. या प्रकरणात महत्त्वाच्या वैद्यकीय नोंदी नष्ट केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
कुटुंबीयांचा दीर्घ लढा
मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगून हात झटकण्यात आले. मात्र, कालांतराने कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवध, पुरावे नष्ट करणे, फसवणूक यासह विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातील सर्व आरोपींच्या भूमिकेचा सखोल अभ्यास केला जात आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.