कराची ते लाहोरपर्यंत हादरा! टी-20 वर्ल्ड कपमधील अपयशानंतर पीसीबीची मोठी कारवाई; बाबर आझम, फखर झमान, नसीम शाहला एकदिवसीय संघातून वगळले
टी-20 वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल घडवून आणले जात आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बांगलादेश दौऱ्यासाठी 15 जणांचा एकदिवसीय संघ (ODI) जाहीर केला असून, स्टार फलंदाज बाबर आझमला या संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. डावखुऱ्या वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
सहा अनकॅप्ड खेळाडूंना संधी
नव्या पिढीला आकार देण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने सहा अशा खेळाडूंना संधी दिली आहे, ज्यांनी अद्याप एकदिवसीय पदार्पण केलेले नाही. अब्दुल समद, माज सदाकत, मोहम्मद गाजी घोरी, साद मसूद, साहिबजादा फरहान आणि शमील हुसैन यांचा संघात समावेश आहे. यापैकी अब्दुल समद, माज सदाकत, साद मसूद आणि शमील हुसैन यांनी अलीकडेच इंग्लंड लायन्सविरुद्ध पाकिस्तान शाहीन संघाकडून चमकदार कामगिरी केली होती.
बाबर, फखर, सॅम अयुबला डच्चू :
सर्वात मोठा धक्का म्हणजे माजी कर्णधार बाबर आझम, आक्रमक सलामीवीर फखर झमान आणि उदयोन्मुख सॅम अयुब यांना एकदिवसीय संघात स्थान मिळालेले नाही. वेगवान गोलंदाज नसीम शाहलाही विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघ सुपर ८ फेरीत बाद झाल्यानंतर बाबरच्या मंद खेळी आणि दबाव हाताळण्यातील अपयशावर तीव्र टीका झाली होती. नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद शतक झळकावूनही अलीकडील खराब फॉर्ममुळे बाबरला वगळण्यात आल्याचे PCB चे स्पष्ट संकेत आहेत.
पाकिस्तनचा बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय संघ :
शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अशरफ, फैसल अकरम, हारिस रऊफ, हुसैन तलत, माज सदाकत, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), मोहम्मद वसीम ज्युनियर, मोहम्मद गाजी गोरी (यष्टिरक्षक), साद मसूद, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा आणि शमील हुसैन.
वेळापत्रक
11 मार्च – पहिला एकदिवसीय सामना (ढाका)
13 मार्च – दुसरा एकदिवसीय सामना (ढाका)
15 मार्च – तिसरा एकदिवसीय सामना (ढाका)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.