"अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा खरा की भ्रम?"; इराणच्या तीन अटींवर अडलं युद्धविराम, निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांचं विश्लेषण
ट्रम्प म्हणाले- इराण उद्ध्वस्त, पण तज्ज्ञांचा सवाल- खोमेनींची राजवट मान्य करणे, नुकसानभरपाई आणि हल्ले न करण्याची हमी या अटी इस्रायल-अमेरिका मान्य करतील का?
नवी दिल्ली : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने विजयाचा दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील युद्ध जिंकल्याचा मोठा दावा करताना म्हटले की, इराणमध्ये हल्ला करण्यासारखे ठिकाण उरलेले नाही आणि इराणचे सर्व महत्त्वाचे नेते मारले गेले आहेत. मात्र, दुसरीकडे इराणने युद्धबंदीसाठी अमेरिका आणि इस्रायलसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य होतील का? युद्ध थांबेल का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी महत्त्वपूर्ण विश्लेषण केले आहे.
इराणच्या तीन अटी काय?
युद्धबंदीसाठी इराणने अमेरिका आणि इस्रायलसमोर ठेवलेल्या तीन अटी पुढीलप्रमाणे आहेत:
1. खोमेनींची राजवट इस्रायलने मान्य करावी
2. युद्धातील नुकसानभरपाई अमेरिका आणि इस्रायलने द्यावी
3. भविष्यात इराणवर पुन्हा हल्ले होणार नाहीत, याची हमी मिळावी
पटवर्धन काय म्हणाले?
निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले की, अमेरिकेच्या युद्ध जिंकल्याच्या दाव्याशी रक्षातज्ज्ञ सहमत नाहीत. "अमेरिका-इस्रायल हे युद्ध जिंकले असे अजून तरी दिसत नाही. इराणने युद्धबंदीसाठी ठेवलेल्या तीन अटी अमेरिका व इस्रायल मान्य करतील का, याबद्दल साशंकता आहे. कारण खोमेनींची राजवट इस्रायल कधीच मान्य करणार नाही. सोबतच युद्धातील नुकसानभरपाई कोण देणार, हाही प्रश्न आहे," असे ते म्हणाले.
सद्यस्थितीबद्दल बोलताना पटवर्धन म्हणाले, "सध्याची इराणची स्थिती पाहता जे नुकसान व्हायचे ते होऊन गेले. आता इराणमध्ये आणखी नुकसान व्हायला काही शिल्लक राहिले नसले तरी इराणकडे भरपूर शस्त्रसाठा शिल्लक आहे. त्यामुळे हे युद्ध इतक्यात थांबेल असे दिसत नाही."
युद्धाचे कारण काय?
2025 मध्ये इराण-इस्त्रायल युद्ध आणि इराण समर्थित गटांशी झालेल्या संघर्षांमुळे इस्रायलने जानेवारीमध्ये इराणला वारंवार इशारा दिला होता की, ते त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांचा विस्तार करू देणार नाहीत. मात्र, इराणने आपला संवेदनशील अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र संबंधित प्रक्रिया सुरूच ठेवल्या. अखेर इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला चढवला, ज्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.