"वंशाला दिवा हवा म्हणून तीन मुलींच्या आईची होरपळ"; बीडमध्ये सासरच्यांनी केलेल्या अमानुष छळाने घेतला बळी
मुलगा होत नसल्याने अडीच वर्षे शारीरिक-मानसिक त्रास; पतीच्या दुसऱ्या लग्नासाठी बाँडपेपरवर सहीची सक्ती, केवळ महिनाभर उपचारानंतर 26 वर्षीय भक्तीचा मृत्यू
बीड : वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, या अंधश्रद्धेने एका तरुण आईचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. केवळ तीन मुली झाल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून भक्ती अमोल कोरडे (वय 26) या विवाहितेने कीटकनाशक प्राशन केले. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 6 मार्च रोजी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
भक्ती हिचा विवाह बीड तालुक्यातील म्हाळसापूर येथील अमोल कोरडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर त्यांना तीन मुली झाल्या. मात्र, मुलगा होत नसल्याच्या कारणावरून गेल्या अडीच वर्षांपासून भक्तीवर सासरच्या मंडळींचा छळ सुरू होता. पती अमोल, सासरा अर्जुन साधू कोरडे आणि सासू आशाबाई अर्जुन कोरडे हे तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते.
दुसऱ्या लग्नासाठी जबरदस्ती
आरोपींचा छळ इतक्यावरच थांबला नाही. पती अमोल याला दुसरे लग्न करायचे असल्याने भक्तीने त्याला संमती द्यावी, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. "तू दुसऱ्या लग्नाला परवानगी दे आणि तसे बाँडपेपरवर लिहून दे," अशी सक्ती करत तिला वारंवार मारहाण केली जात होती. या सततच्या त्रासामुळे आणि अपमानामुळे भक्ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती.
अखेर 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी भक्तीने घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, महिनाभर उपचार सुरू असतानाही तिची प्रकृती सुधारली नाही आणि 6 मार्च रोजी तिने अखेरचा श्वास घेतला.
भक्तीच्या मृत्यूनंतर तिची आई गंगूबाई प्रभू ठोकळ यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती अमोल कोरडे, सासरा अर्जुन कोरडे आणि सासू आशाबाई कोरडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन घोलवाल या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुलगा-मुलगी समान मानण्याच्या काळातही केवळ मुली झाल्या म्हणून एका महिलेला जीव गमवावा लागल्याने बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. तीन चिमुकल्यांचे आईचे छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.