नागपूरच खळबळजनक खून! पत्नीने पतीसोबत मिळून प्रियकराला संपवलं; होळीसाठी गावी आलेल्या तरुणाची भरदिवसा चाकूने भोसकून हत्या
लग्नानंतरही कायम होते प्रेमप्रकरण; इन्स्टाग्रामवरून भेटीसाठी बोलावले, पतीने केला पाठलाग; दोघांना अटक
नागपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध लग्नानंतरही कायम ठेवल्याच्या रागातून पती-पत्नीने मिळून प्रियकराची भरदिवसा हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. होळी साजरी करण्यासाठी पुण्यावरून गावी आलेल्या तरुणाला भेटायला बोलावून त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नी या दोघांना अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा-कोराडी रोडवर गुरुवारी (५ मार्च) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव सागर वानखेडे (रा. सावंगी) असून तो पुण्यात नोकरी करत होता. होळी साजरी करण्यासाठी तो गावी परतला होता. आरोपी राजू गजभिये आणि त्याची पत्नी सोनाली गजभिये अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्रेमप्रकरणामुळे हत्या
पोलीस तपासात उघडकीस आल्याप्रमाणे, सागर आणि सोनाली यांच्यात शिक्षण घेत असतानापासून प्रेमसंबंध होते. सोनालीचे लग्न राजूसोबत झाले आणि त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र लग्नानंतरही सागर आणि सोनाली यांच्यात संपर्क कायम होता. यापूर्वीही राजूने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
कशी घडली घटना?
होळीसाठी गावी आलेल्या सागरने इन्स्टाग्रामवरून सोनालीला भेटण्यासाठी संदेश पाठवला. सोनालीने चाकू घेऊन सागरला भेटण्याचे ठरवले. सकाळी श्याम मंगल कार्यालयाजवळ सोनाली सागरच्या बाईकवर बसली. राजूने मुलांना शाळेत सोडल्यानंतर दोघांचा पाठलाग केला.
खापरखेडा-कोराडी रोडवरील कोलार नदीचा पूल ओलांडल्यानंतर सोनालीने मुद्दाम तिची पर्स खाली पाडली. सागर पर्स उचलण्यासाठी खाली उतरताच सोनालीने चाकूने त्याच्यावर दोन वार केले. त्याचवेळी तेथे पोहोचलेल्या राजूनेही सागरवर अनेक वार केले. या हल्ल्यात सागरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
आरोपींना अटक
घटनेनंतर आरोपी पती-पत्नी घरी गेले. पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्यासाठी जात असताना पोलिसांच्या डीबी पथकाने त्यांना रस्त्यातच ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी हत्येची कबुली दिली आहे. सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कोराडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.