अजित पवार अपघातप्रकरणी सुप्रिया सुळेंची मोठी मागणी; म्हणाल्या, "पारदर्शक चौकशी व्हावी"
पार्थ पवारांना खासदारकीचा सल्ला: 'कान उघडे ठेव, कमी बोल, अभ्यासपूर्ण बोल'; राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्याने सर्व उमेदवारांना शुभेच्छा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी मागणी केली आहे. अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली असून यामुळे जनतेत अस्वस्थता असल्याचे सांगितले. तसेच राज्यसभेसाठी निवडून आलेले पार्थ पवार यांना त्यांनी खासदारकीचा महत्त्वाचा सल्ला दिला.
अजितदादांच्या अपघाताची चौकशी पारदर्शक व्हावी
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अजितदादांवर प्रेम करणारी सर्वच जनता त्यांच्या अपघातामुळे अस्वस्थ आहे. त्यामुळे अजितदादांच्या अपघाताचा पारदर्शक तपास व्हावा, अशी सर्वांचीच मागणी आहे. रोहित पवार आणि जय पवार यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे दादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हायला हवी."
राज्यसभा निवडणुकीनंतर सुळेंची प्रतिक्रिया
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, "गेल्या सहा दशकांपासून शरद पवारांना ज्या लोकांनी साथ दिली, ते लोक आजही आमच्यासोबत आहेत. 1967 पासून सुरू झालेला पवार साहेबांचा राजकीय प्रवास बारामतीच्या जनतेमुळेच आजही सुरू आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे आभार. आज बिनविरोध निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराला माझ्या शुभेच्छा."
पार्थ पवारांना खासदारकीचा सल्ला
नवनिर्वाचित खासदार पार्थ पवार यांना मार्गदर्शन करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "संसदेची पायरी चढण्याची संधी फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे मिळाली आहे. जोपर्यंत त्यांच्या भावनेशी प्रामाणिक राहशील, तोपर्यंत ही पायरी चढत राहशील, असा सल्ला शरद पवारांनी मला दिला होता. तोच सल्ला मी, एक आत्या म्हणून, पार्थला देते."
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, "लोकसभा आणि राज्यसभेत कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचे. जेव्हा बोलायची वेळ येईल, त्यावेळी अभ्यासपूर्ण बोलायचे. कारण त्या ठिकाणी बसलेला व्यक्ती आपल्यापेक्षा ज्ञानी असतो आणि देश आपल्याकडे बघत असतो."
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.