अल्लू अर्जुनच्या 'AA22xA6' मध्ये भूमिका ठरणार का? 'कला' नंतर थेट तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पणाची शक्यता; अधिकृत घोषणेची प्रेक्षकांना उत्सुकता
मुंबई: बॉलिवूड सिनेसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अनुष्का शर्माने २०१७ मध्ये टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहलीशी लग्न केल्यानंतर रुपेरी पडद्यापासून दूर जाऊन संसाराला प्राधान्य दिले. आता ती दोन मुलांची आई आहे. बऱ्याच वर्षांपासून तिच्या कमबॅकच्या चर्चा रंगत होत्या, पण त्या फक्त चर्चाच राहिल्या. मात्र, आता तब्बल ८ वर्षांनी अनुष्का शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यावेळी फक्त अफवा नसून, याबाबत मोठी अपडेटही समोर आली आहे.
शेवटची भूमिका 'झिरो'मध्ये
अनुष्का शर्मा शेवटची २०१८ मध्ये आलेल्या 'झिरो' या चित्रपटात दिसली होती. शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबतची ही फिल्म बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकली नाही. त्यानंतर तिने क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या बायोपिकवर काम केले. या सिनेमाचा टीझरही प्रदर्शित झाला होता, मात्र हा सिनेमा स्थगित करण्यात आला. २०२१ मध्ये अनुष्कानं 'कला' या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. तिला पडद्यावर पाहून चाहते भारावून गेले होते, पण त्यानंतर ती कोणत्याही नव्या सिनेमात दिसली नाही.
१८०० कोटींच्या तेलुगू फिल्ममधून डेब्यू?
सध्या अनुष्का शर्मा तेलुगू सिनेसृष्टीतून कमबॅक करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. साउथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार अल्लू अर्जुनयांच्या आगामी सिनेमात, ज्याचं तात्पुरतं टायटल 'AA22xA6' असं ठेवण्यात आलं आहे, अनुष्का महत्त्वाची भूमिका साकारू शकते, अशी माहिती समोर येत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली करत आहे. या सिनेमाची बजेट सुमारे १८०० कोटी रुपये असल्याची चर्चा आहे.
वाढदिवसाच्या मुहूर्तावर घोषणा?
मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमाचं अधिकृत टायटल ८ एप्रिल २०२६ रोजी, म्हणजेच अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. हे अनावरण एका विशेष व्हिडीओद्वारे केलं जाईल, ज्यामध्ये सिनेमाची पहिली झलक पाहायला मिळेल. या व्हिडीओमध्ये प्रगत 'VFX' तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि त्यामध्ये अल्लू अर्जुनचे अनेक नवे लूक प्रदर्शित केले जातील, असंही सांगण्यात येत आहे.
प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
अद्याप या वृत्तांना कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, जर हे वृत्त खरं ठरलं तर अनुष्काचा तेलुगू सिनेसृष्टीतील पदार्पणासोबतच तिचा दमदार कमबॅक ठरेल. विराट कोहलीशी लग्नानंतर आठ वर्षांनी अनुष्का पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.