खुर्चीत बसलेली तरुणी, बांधलेले हात आणि बंदुकीची गोळी; 'बोल बोल राणी'च्या रिलीज तारखेने चाहत्यांची उत्सुकता शिगेला
सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर झळकणार एकत्र; सिड विंचुरकर दिग्दर्शित थ्रिलरचा प्रोमो व्हिडीओ चर्चेत, 10 जुलैला प्रदर्शन
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील तीन दमदार कलाकार सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर यांना एकत्र घेऊन येणाऱ्या 'बोल बोल राणी' या चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर झाली आहे. सिड विंचुरकर निर्मित आणि दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 10 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या काही सेकंदांच्या प्रोमो व्हिडीओने चाहत्यांची उत्सुकता शिगेला नेली आहे. खुर्चीत बसलेली एक तरुणी, बांधलेले हात, पार्श्वभूमीला घोंगावणारं रहस्यमयी संगीत आणि बंदुकीतून सुटलेली गोळी... या सगळ्यामुळे 'नेमकं घडलंय तरी काय?' असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.
दमदार स्टारकास्ट
विशेष म्हणजे, पंधरा वर्षांनंतर सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर हे तीन दमदार कलाकार एकत्र झळकणार असल्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यांच्यासोबत संभाजी ससाणेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रोमो व्हिडीओमुळे चित्रपटाच्या कथेबाबत कोणताही थेट उलगडा होत नसला, तरी त्यात दडलेली अस्वस्थ करणारी शांतता आणि थरारक वातावरण चित्रपट एका वेगळ्याच पातळीवर नेणार असल्याचं स्पष्ट होतं.
दिग्दर्शकाची प्रतिक्रिया
चित्रपटाबद्दल निर्माते-दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणतात, "थ्रिलर म्हणजे फक्त भीती दाखवणं नाही, तर प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करणं आणि शेवटपर्यंत त्यांना अस्वस्थ ठेवणं. 'बोल बोल राणी'चा हा व्हिडीओ या प्रवासाचा पहिला टप्पा आहे. प्रत्येक आवाज, प्रत्येक शांतता आणि प्रत्येक दृश्यामागे एक अर्थ आहे. प्रेक्षकांनी हा थरार अनुभवण्यासाठी सज्ज राहावं."
चित्रपटाची माहिती
न्यूझिलंड मोशन पिक्चर्स आणि फिफ्टी टू फ्रायडे निर्मित या चित्रपटाचे अपूर्वा मोतीवाले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत. यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा सहनिर्माते असून तपन विचारे, यश राम शाहानी, आयुष कृप्लानी असोसिएट निर्माते आहेत. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे या चित्रपटाला संगीत लाभले आहे. नेमकी ही मुलगी कोण? तिचे हात का बांधलेले आहेत? गोळी कुणासाठी आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच उत्सुक झाले आहेत. रहस्यमयी कथानक, तगडी स्टारकास्ट आणि वेगळ्या मांडणीमुळे 'बोल बोल राणी' हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनत आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.