हार्दिक पांड्याविरोधात मोठी कारवाई! तिरंग्याचा 'अपमान' केल्याप्रकरणी एफआयआर दाखल; पुण्यातील वकिलाने केली तक्रार
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर गर्लफ्रेंडसोबत मैदानात आक्षेपार्ह सेलिब्रेशन; राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप, 1971 च्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पुणे : भारताचा टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा आनंद साजरा करताना अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने केलेल्या सेलिब्रेशनने त्याला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मा यांच्या मैदानातील वादग्रस्त सेलिब्रेशनप्रकरणी पुण्यातील वकिलाने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.
न्यूझीलंडचा पराभव करून भारताने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळाडूंनी जल्लोष साजरा केला होता. यावेळी हार्दिक पांड्याने तिरंग्यात गुंडाळून महिका शर्मासोबत केलेल्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हार्दिकच्या खांद्यावर तिरंगा, गळ्यात विजेतेपदाचे मेडल असताना तो महिकासोबत बक्षीस वितरणासाठी उभारलेल्या स्टेजवर झोपल्याचे पाहायला मिळाले होते. या कृतीमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला होता.
वकिलाने काय म्हटले?
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वकील वाजिद खान यांनी हार्दिक पांड्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. एएनआयशी बोलताना खान म्हणाले, "तुम्ही टी-20 विश्वचषक पाहिला असेल. हार्दिक पांड्या आपल्या गर्लफ्रेंडसोबत विजयाच्या आनंदात नाचत होता. त्याच्या पाठीशी राष्ट्रध्वज बांधलेला होता. 1971 च्या राष्ट्रध्वज कायद्याच्या कलम 2 नुसार, आपण राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे. मात्र, हार्दिक पांड्या विजयाच्या सेलिब्रेशनमध्या इतका बेभान झाला होता की तो राष्ट्रध्वज परिधान करून आपल्या गर्लफ्रेंडसोबत झोपला होता. माझ्या मते हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे."
क्षेत्राधिकाराबाबत पोलिसांनी आक्षेप घेतल्याचेही खान यांनी सांगितले. ते म्हणाले, "मी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जेव्हा मी तक्रार दाखल करण्यासाठी गेलो, तेव्हा त्यांनी सांगितले की ही घटना इथे नव्हे तर अहमदाबाद येथे घडली आहे. तेव्हा मी त्यांना सांगितले की राष्ट्रध्वज हे संपूर्ण राष्ट्राचे प्रतीक आहे आणि आपण शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल करू शकतो. त्यांनी माझी तक्रार स्वीकारली आणि मला त्याची प्रत दिली."
कोणता कायदा केला जाणार लागू?
ही तक्रार 'प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर अॅक्ट, 1971' अंतर्गत दाखल करण्यात आली आहे. या कायद्याच्या कलम 2 नुसार, कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक दृश्यात राष्ट्रध्वजाचा अनादर करते किंवा त्याचा अपमान करते, तर तो गुन्हा ठरतो.
काय आहे प्रकरण?
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर महिका हार्दिकसोबत मैदानात दिसली होती. दोघे मैदानावर नाचत होते, फिरत होते. महिकाने हार्दिकला अनेकदा मिठी मारली आणि गालावर किस केले होते. यावेळी ग्राउंड स्टाफ दोघांकडे बघत बसल्याचेही दिसून आले होते. या व्हिडीओंनी सोशल मीडियावर मोठी चर्चा पेटवली होती.
पोलिसांनी तक्रार स्वीकारली असली तरी, अद्याप एफआयआरची औपचारिक नोंद झालेली नाही. अधिकारी घटनेच्या व्हिडीओ फुटेजची तपासणी करून प्रथमदर्शनी गुन्हा दाखल होण्याजोगा आहे का, हे पाहणार आहेत.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.