सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या सुखी संसाराचा 'दी एन्ड'; चारच वर्षांत मोडला संसार, पोटगीशिवाय पतीपासून विभक्त
जयपूरच्या मुंडोटा फोर्टमध्ये 2022 मध्ये झाला होता भव्य विवाह; गेल्या वर्षापासून वेगळे राहत होते, वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटास मंजुरी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्या सुखी संसारावर अवघ्या चार वर्षांत पूर्णविराम लागला आहे. तिने बिझनेसमन सोहेल खतुरियापासून अधिकृतपणे घटस्फोट घेतला असून, मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, हंसिकाने कोणत्याही प्रकारच्या पोटगीची मागणी केलेली नाही.
हंसिका आणि सोहेल यांनी डिसेंबर 2022 मध्ये जयपूर येथील 'मुंडोटा फोर्ट अँड पॅलेस'मध्ये एका भव्य समारंभात लग्नगाठ बांधली होती. राजेशाही थाटात पार पडलेल्या या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली होती. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच या जोडप्यात मतभेद सुरू झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.
गेल्या वर्षभरापासून हंसिकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून सोहेलसोबतचे सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलिट केल्याने चाहत्यांच्या मनात शंका निर्माण झाली होती. क्षुल्लक गोष्टींवरून वारंवार होणारे वाद आणि दोघांची वेगवेगळी लाइफस्टाईल यामुळे एकत्र राहणे अशक्य झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायालयातील सुनावणीदरम्यान हंसिकाचे वकील अद्वान शेख उपस्थित होते. हंसिकाने पोटगीची मागणी न केल्याने घटस्फोटाची प्रक्रिया सुलभ झाली. सोहेल खतुरियासाठी हे दुसरे लग्न होते. त्यापूर्वी त्याचे रिंकी बजाज याच्याशी लग्न झाले होते.
हंसिका मोटवानी हिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असून, बॉलिवूडमध्येही तिचा उमदा चेहरा प्रेक्षकांच्या परिचयाचा आहे. तिच्या घटस्फोटाच्या या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.