फारुख अब्दुल्लांच्या मानेवर बंदूक, गोळी डोक्यावरुन गेली; हल्लेखोर म्हणाला- "20 वर्षांपासून मारण्याचा विचार करत होतो"
जम्मूमध्ये लग्न समारंभातून बाहेर पडताना माजी मुख्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला; सुदैवाने अब्दुल्ला बचावले, हल्लेखोर कमल सिंग जामवाल ताब्यात
जम्मू : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे संरक्षक डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी (11 मार्च) जम्मूमध्ये प्राणघातक हल्ला झाला. एका हल्लेखोराने मागून येऊन त्यांच्या मानेवर बंदूक ठेवली आणि गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी फारुख अब्दुल्ला यांच्या डोक्यावरून निघून गेल्याने ते थोडक्यात बचावले. या हादरवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, संपूर्ण जम्मूमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
फारुख अब्दुल्ला जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागात एका वकिलाच्या मुलीच्या लग्न समारंभात उपस्थित होते. समारंभ आटोपून ते बाहेर पडत असताना हल्लेखोर कमल सिंग जामवाल याने मागून येऊन त्यांच्या मानेवर बंदूक ठेवली आणि गोळी झाडली. यावेळी फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत असलेल्या लोकांनी तत्काळ हल्लेखोराला पकडले. घटनेच्या वेळी जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरीही उपस्थित होते. गोळीबारादरम्यान त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
लग्नात उपस्थित असलेले राकेश सिंग म्हणाले, "आम्ही सर्व एकत्र बसलो होतो. फारुख अब्दुल्ला म्हणाले, 'चला आता निघूया.' आम्ही सर्वजण निघत असताना एका माणसाने येऊन फारुख अब्दुल्ला यांच्यावर बंदूक ठेवली. यावेळी गोळी त्यांच्या डोक्याच्या वरून निघून गेली."
हल्लेखोर कोण?
पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. हल्लेखोराचे नाव कमल सिंग जामवाल असून, तो जम्मूच्या पुरानी मंडी परिसरातील रहिवासी आहे. 1963 मध्ये जन्मलेल्या जामवालची जम्मूच्या जुन्या शहर परिसरात अनेक दुकाने असून, त्यांच्या भाड्याने तो उदरनिर्वाह करतो. चौकशीदरम्यान आरोपीने धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणाला, "मी 20 वर्षांपासून फारुख अब्दुल्लाला मारण्याचा विचार करत होतो. हा माझा वैयक्तिक अजेंडा होता."
या घटनेमुळे जम्मूमध्ये सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.