⚡ ब्रेकिंग News

'प्रफुल पटेल, तटकरेंना संपूर्ण पक्षाचा ताबा घ्यायचा होता..; 'राजकारण लय वंगाळ झालंय' हे सुनेत्रा काकींना सांगायचंय, रोहित पवारांनी सगळंच सांगितलं


 'प्रफुल पटेल, तटकरेंना संपूर्ण पक्षाचा ताबा घ्यायचा होता..; 'राजकारण लय वंगाळ झालंय' हे सुनेत्रा काकींना सांगायचंय, रोहित पवारांनी सगळंच सांगितलं

अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या १८ दिवसांतच निवडणूक आयोगाला पत्र देऊन संविधानातील बदलाचा दावा; गुन्हेगारी तपासाची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत खळबळजनक दावे आणि आरोप केले आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षावर ताबा मिळवण्यासाठी प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कट रचल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला. या प्रकरणाची गुन्हेगारी तपास करण्याची मागणीही त्यांनी केली.

निवडणूक आयोगाला पत्रव्यवहाराचा खुलासा

रोहित पवार म्हणाले, "अजितदादांच्या निधनानंतर (२८ जानेवारी २०२६) अवघ्या १८ व्या दिवशी म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले. या पत्राद्वारे पक्षाच्या संविधानात बदल केल्याचे खोटे सांगितले आणि पक्षाचे सर्व अधिकार 'कार्याध्यक्षां' (प्रफुल पटेल) यांच्याकडे देण्याची मागणी केली. हे करताना त्यांनी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना विश्वासात घेतले नव्हते."

"सुनेत्रा काकी जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांना या पत्रव्यवहाराची कुणकुण लागली असावी. म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून २८ जानेवारी ते त्यांच्या अध्यक्षपदापर्यंत झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती केली," असेही रोहित पवार यांनी सांगितले.

'सर्व अधिकार प्रफुल पटेल यांच्याकडे' असा दावा

रोहित पवार पुढे म्हणाले, "२६ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सह्या आहेत. या पत्रात म्हटले होते की, पक्षाचे संविधान बदलले आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल, तर नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट (कार्यकारी अध्यक्ष) यांच्याकडे सर्व अधिकार असतील. सर्व निर्णय तेच घेतील, असा उल्लेख होता. नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट म्हणजे प्रफुल पटेल होते. या पत्रात सर्व अधिकार त्यांना देण्याची मागणी केली होती."

'राजकारण लय वंगाळ झालंय'

रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी बोलताना म्हटले की, "सुनेत्रा काकींना सांगायचं आहे की राजकारण लय वंगाळ झालंय. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी सांगितले होते की, अधिवेशनात कोणीही अजित पवार यांच्या अपघाताबद्दल बोलायचं नाही. त्यामुळे काही आमदार सोडले तर कोणीही सभागृहात याबद्दल बोलत नव्हते."

जय पवार यांची पत्रकार परिषद दाबली?

रोहित पवार यांनी आरोप केला की, "सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि भाजपच्या काही नेत्यांनी जय पवार यांची पत्रकार परिषद दाबली. त्यांच्या दबावामुळे ही पत्रकार परिषद झाली नाही. पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल हे पक्षाचे अध्यक्ष झाल्याचे विधान केले आणि नंतर 'चुकीने बोललो' असे सांगितले. हा घटनाक्रम संशयास्पद वाटतो."

क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची मागणी

रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची गुन्हेगारी तपास (क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन) करण्याची मागणी केली. ते म्हणाले, "हा संपूर्ण कट आधीच रचला गेला होता का? पक्षावर ताबा मिळवण्यासाठी हे सर्व घडवून आणले गेले का? याचा तपास व्हायला हवा."

ब्लॅक मॅजिकचा संशय आणि झिरो एफआयआरबाबत

रोहित पवार यांनी पुढे म्हटले की, "अजितदादा जिवंत असतानाच त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक किंवा संशयास्पद पूजा करण्याचा प्रयत्न झाला होता. यात नाशिकच्या भोंदूबाबाचा समावेश असावा, असा संशय आहे. पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठीच हा प्रकार केला गेला होता का?"

"२८ जानेवारी रोजी अजित पवारांचा झालेला अपघात हा खरोखरच अपघात होता की घातपात? याची चर्चा आणि तपास सुरू आहे. व्हीएसआर कंपनीला वाचविण्याचे काम सुरू असून, अपघातानंतरही तिला ८० ते ९० कोटी रुपये देण्यात आले. राहुल गांधी यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितले की, जिथे तुला न्याय मिळेल त्या राज्यात एफआयआर कर. त्यामुळे आम्ही कर्नाटकात जाऊन झिरो एफआयआर केला," अशी माहितीही रोहित पवारांनी यावेळी दिली.

रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेद्वारे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधला असून, या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय भूकंपाची स्थिती निर्माण झाली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...