खरातचे कर्मचारी व पुजारी नंतर आता विश्वस्तांवर तपासाची शक्यता; संस्थानचा फलक गायब होऊन वाढली खळबळ
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत असताना आता तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरातचे कर्मचारी आणि मंदिरातील पुजाऱ्यांनंतर शिवनिका संस्थानच्या विश्वस्तांचीही चौकशी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात माजी विश्वस्त असलेल्या रुपाली चाकणकर यांचीही चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवनिका ट्रस्टवर तपासाची घट्ट फास
मिळालेल्या माहितीनुसार, शिवनिका संस्थानचे अध्यक्षपद स्वतः अशोक खरात यांच्याकडे होते. काही वर्षांपूर्वी जुन्या ट्रस्टींनी साथ सोडल्यानंतर नव्या विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये खरात यांनी स्वतःच्या पत्नीचाही समावेश केला होता, तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर याही या संस्थानच्या विश्वस्त मंडळावर होत्या.
आता तपास यंत्रणेकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, संस्थानमधील कारभार, निर्णयप्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. याच अनुषंगाने संबंधित ट्रस्टींना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विश्वस्त मंडळाचा फलक अचानक गायब
रुपाली चाकणकर यांनी यापूर्वीच विश्वस्त मंडळाची मुदत ऑगस्ट २०२५ मध्ये संपल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, खरात यांची अटक झाल्यानंतर संस्थानच्या विश्वस्त मंडळाचा फलक अचानक गायब झाल्याची बाब समोर आल्याने संशय अधिक गडद झाला आहे. यामुळे संस्थानच्या कारभारातील गोपनीयता आणि दबावतंत्राबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रुपाली चाकणकर यांचा राजीनामा आधीच
अशोक खरात प्रकरणामुळे आधीच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. खरातच्या पाद्यपूजेचे काही फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता.
पुढचे पाऊल काय?
आता शिवनिका संस्थानच्या विश्वस्तांवर चौकशीचा बडगा उगवल्याने रुपाली चाकणकर यांच्यासह संस्थानशी संबंधित सर्व व्यक्तींची भूमिका तपासली जाण्याची शक्यता आहे. तपासाचा फास अधिक घट्ट होत असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवनिका संस्थानशी संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई होणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.