'गल्ली ते दिल्ली'च्या सत्तेने मित्रपक्षांचे नाक दाबले; रोहिणी खडसेंचा महायुतीला गर्भित इशारा - 'हा २०२९ चा टिझर, लक्षात ठेवा'
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील ड्राम्याचा दाखला; खडसे म्हणाल्या, "शरण जाणारे गुलाम ठरतात, लढणाऱ्यांचा इतिहास सांगितला जातो"
मुंबई: सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतच झालेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या नेत्या रोहिणी खडसे यांनी महायुतीतील मित्रपक्षांना मोठा इशारा दिला आहे. भाजपवर कडक टीका करताना त्यांनी ही घटना २०२९ च्या लोकसभा निवडणुकीचा 'टिझर' असल्याचे म्हटले आहे.
नेमकी घटना काय?
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांची निवडणूकपूर्व युती होती. या दोन्ही पक्षांचे मिळून ३५ सदस्य निवडून आले होते, तर भाजपचे २७ सदस्य निवडून आले होते. संख्याबळानुसार राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता येणे निश्चित होते. मात्र, भाजपने अध्यक्षपदासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. निवडीच्या दिवशी मोठा राडा झाला. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्याच सदस्यांना सभागृहापर्यंत नेण्यासाठी पोलिसांशी आणि प्रशासनाशी झुंज द्यावी लागली. या झटापटीत शंभूराज देसाई जखमी झाले, तर मकरंद पाटील यांना २०-२५ पोलिसांनी घेरले होते. अखेर, प्रशासकीय बळाचा वापर करून भाजपने आपला अध्यक्ष निवडून आणला.
रोहिणी खडसे काय म्हणाल्या?
या संपूर्ण प्रकरणावर रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मित्रपक्षांना सावध केले आहे. त्या म्हणाल्या, "सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या दिवशी जे काही झाले त्यातून काय सावध बोध घ्यायचा आहे, तो सत्तेतील इतर दोन पक्षांनी घ्यायला हवा! सत्ताधारी मित्र पक्षांसाठी धोक्याची घंटा!"
त्यांनी पुढे लिहिले, "ज्या पक्षाची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, त्या पक्षाने एक जिल्हा परिषद अध्यक्ष निवडण्यासाठी इतर मित्र पक्षांचे पार नाक दाबले. ही २०२९ ची वॉर्निंग बेल आहे, शतप्रतिशत भाजपसाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. सत्तेतील इतर दोन पक्षांनी लक्षात ठेवावं, हा तर टिझर आहे, २०२९ ते तुम्हाला पिक्चर दाखवतील."
"लढायचे की शरण जायचे ते ठरवा"
खडसे यांनी महायुतीतील मित्रपक्षांना स्पष्ट इशारा देत म्हटले, "लढायचे की शरण जायचे ते ठरवा! शरण जाणारे गुलाम ठरतात आणि लढणाऱ्यांचा इतिहास सांगितला जातो."
दरम्यान, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या या निवडणुकीने महायुतीतील आघाडीच्या पक्षांमधील तणाव उघड झाला असून, भविष्यातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.