तीन दिवसांची पोलीस कोठडी वाढवत न्यायालयाने तपास यंत्रणेला दिला मोठा दिलासा; आता १ एप्रिलपर्यंत भोंदूबाबा अशोक खरात पोलीस कोठडीत
नाशिक – विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज (रविवारी) नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अशोक खरात याला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावत त्याचा तुरुंगवास १ एप्रिलपर्यंत वाढविला. सरकारी वकिलांनी न्यायालयात एक महत्त्वपूर्ण माहिती देताना सांगितले की, खरातच्या मोबाईलमध्ये काही राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावाने सेव्ह करण्यात आल्याची शक्यता आहे.
सरकारी वकिलांनी न्यायालयात काय म्हटले?
आजच्या सुनावणीवेळी अशोक खरातच्या वकिलांनी पोलीस कोठडीच्या मागणीला जोरदार विरोध केला. मात्र, सरकारी वकिलांनी खरातची पोलीस कोठडी वाढवणे किती आवश्यक आहे, हे न्यायालयाला पटवून दिले.
सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, “अशोक खरात हा तपासात पोलिसांना सहकार्य करत नाही. महिलांवरील अत्याचाराचा विषय निघताच तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देतो. त्याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचे काम फॉरेन्सिक टीमकडून सुरू असून आम्ही त्याची क्लोन कॉपी घेतली आहे. या मोबाईलमध्ये काही राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावाने सेव्ह केल्याची शक्यता आहे. या सर्वांची माहिती मिळवण्यासाठी खरातची पोलीस कोठडी वाढवणे आवश्यक आहे.”
न्यायालयाने कोणत्या कारणांसाठी वाढविली कोठडी?
न्यायालयाने खालील कारणांमुळे अशोक खरात याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली:
१. तपासात सहकार्य न करणे – अशोक खरात तपास यंत्रणांना सहकार्य करत नसल्याने अधिक कालावधीची आवश्यकता.
२. मोबाईल डेटाची चौकशी – खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करून त्याची समक्ष चौकशी करणे बाकी.
३. गुंगीच्या पदार्थाचा तपास – महिलांना पाजण्यात येणारे खारट-कडू पाणी आणि पेढ्यांची तपासणी. हे पदार्थ खाल्ल्यानंतर महिलांना मळमळ, गरगर व डोके जड होत असल्याचे समोर आले आहे. हा नेमका काय पदार्थ आहे, याचा तपास करणे बाकी.
४. मालमत्तेचा शोध – भोंदूगिरी करून अशोक खरातने कोठे आणि कोणाच्या नावावर मालमत्ता जमा केली, याचा तपास करायचा आहे.
५. साथीदारांचा शोध – अशोक खरातने केलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कोणी त्याला मदत केली का, याचा तपास करणे आवश्यक.
६. तपासाची व्याप्ती – हे प्रकरण मोठे असून तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. आरोपीकडून गुन्ह्याची माहिती, डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर पीडित महिलांची माहिती मिळवणे बाकी आहे.
या सर्व कारणांमुळे न्यायालयाने अशोक खरात याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावत १ एप्रिलपर्यंत त्याचा मुक्काम पोलीस कोठडीत वाढविला.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.