मुंबई – इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता भारतीय शेती क्षेत्रावरही दिसू लागला आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे शेतीमालाच्या आयात-निर्यातीवर शंभर टक्के परिणाम होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे. देशातील माल निर्यात होत नसल्याने त्याचा फटका बाजारभावावर होत असून, युरियाच्या साठ्याबाबतही भविष्यात काळजी घ्यावी लागेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
"१७ एप्रिलनंतर तापमान वाढणार, पाण्याचा काटकसरीने वापर करावा"
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले. ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असून, उन्हाळा कडक झाला आहे. १७ एप्रिलनंतर तापमानात आणखी वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही कृषीमंत्र्यांनी केले.
कोकणातील काजू उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात
हवामान बदलाने उत्पादनात ६०-६५ टक्के घट; जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीने शेतकरी हैराण
सिंधुदुर्ग – कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी यंदा हवामानातील बदलामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे काजू उत्पादनात ६० ते ६५ टक्क्यांनी घट झाली आहे, तर दुसरीकडे उरलेले उत्पादन जंगली प्राण्यांनी तोडून वाया घालवल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी विशेषतः 'शेकरू' या प्राण्यामुळे त्रस्त झाला आहे.
शेकरू प्राण्याचा नुकसानग्रस्त यादीत समावेश करावा – शेतकऱ्यांची मागणी
शेकरू हा संरक्षित प्राणी असून सिंधुदुर्गात त्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा प्राणी काजूची बी खाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहे. मात्र, नुकसानग्रस्त यादीत शेकरूचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेकरू प्राण्याचा नुकसानग्रस्त यादीत समावेश करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.