अजित पवार अपघातप्रकरणी मोठा ट्विस्ट! सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
'अपघात नव्हे तर घातपाता'च्या संशयाने पवार कुटुंबीय दिल्लीकडे; रोहित पवारांच्या आरोपांना सुनेत्रा-पार्थचा पाठिंबा?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी आता मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय पवार कुटुंबीयांना वाटत असून याप्रकरणी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काय मागणी करणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, पवार कुटुंबीय पंतप्रधानांसमोर अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणार आहेत. तसेच व्हीएसआर कंपनीची सर्व विमाने जमिनीवर आणण्याची मागणीही केली जाणार आहे. सध्या व्हीएसआर कंपनीच्या लेअरजेट विमानांवरच बंदी घालण्यात आली असून इतर विमाने सुरू आहेत.
रोहित पवारांच्या आरोपांना दुजोरा?
यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित करत व्हीएसआर कंपनीच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला होता. त्यासाठी त्यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषदा घेऊन कंपनीवर गंभीर आरोप केले होते. आता अजित पवारांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधानांची भेट घेण्याचा निर्णय घेतल्याने रोहित पवारांच्या आरोपांना दुजोरा मिळाल्याचे बोलले जात आहे.
सुप्रिया सुळेंचीही मागणी
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. अजितदादांच्या अपघातामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच लोक अस्वस्थ असून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, असे त्या म्हणाल्या.
आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे धाव
एकीकडे पवार कुटुंबीय पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आमदार संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एआयबीच्या अहवालातील त्रुटींवर चर्चा करणार आहेत.
अजित पवारांच्या अपघातानंतर पवार कुटुंबीयांनी केलेली ही पहिलीच मोठी राजकीय हालचाल असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.