‘ताज का राज’ वादात महिला नेत्यांची छन्नाछन्नी! सुषमा अंधारेंचा शितल म्हात्रेंना सवाल – ‘तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का?’
अशोक खरात प्रकरणातून शितल म्हात्रे यांनी ठाकरेंना लक्ष्य केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला. दोन्ही नेत्या ट्विटरवर आमने-सामने आल्या आहेत.
विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषद सभागृहात उद्धव ठाकरेंसह नऊ आमदारांचा निरोप समारंभ झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. यावरून शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. तर अशोक खरात प्रकरणावरूनही तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरले जात आहे. यातच शिंदे गटाच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी ट्विट करत थेट ठाकरे कुटुंबीयांना लक्ष्य केले. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी शितल म्हात्रेंवर पलटवार केला. दोन्ही महिला नेत्यांमध्ये ट्विटरवरून जोरदार छन्नाछन्नी रंगल्याचे दिसून येत आहे.
काय होता वादाचा मुद्दा?
शितल म्हात्रे यांनी अशोक खरात प्रकरणावरून ‘ताज का राज’, ताज हॉटेलमध्ये बैठक कोणाची झाली, असा सवाल करत ठाकरेंना लक्ष्य केले होते. “क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे… यही तो नही ‘ताज’ का राज? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे. ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल,” असे ट्विट शितल म्हात्रे यांनी केले होते.
सुषमा अंधारेंचा सवाल
शितल म्हात्रे यांच्या या ट्विटवर सुषमा अंधारे यांनी पलटवार केला. “अहो विषय भरकटवू नका. आपण तुमच्यावर संशोधन करायला बोलत आहोत. बाय द वे, तुमचा व्हिडिओ मॉर्फ केलाय असं तुम्ही म्हणाला होतात. तोच तो सुर्वे प्रकरणातला, त्यातला नेमका ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो?” असा सवाल सुषमा अंधारे यांनी शितल म्हात्रे यांना उद्देशून केला.
शितल म्हात्रे यांचा रिप्लाय
सुषमा अंधारे यांच्या सवालाला शितल म्हात्रे यांनीही उत्तर दिले. “सुषमाताई, मूळ विषय हा ताजमध्ये झालेल्या मीटिंगचा आहे. त्यामुळे उगाच इकडे तिकडे उड्या मारू नका. खरातला पाण्याची लाईन देण्यासाठी ताजमध्ये कोणी बैठक घेतली होती? त्यासाठी मध्यस्थी करणारा नेता कोण होता? पाईपलाइनचा जी.आर. काढण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमने आदेश दिला होता की नाही? त्यामागे कुठली न्यूमरॉलॉजी होती? याची चर्चा व्हायला पाहिजे ना, ताई?” असे शितल म्हात्रे यांनी म्हटले.
पुढे त्या म्हणाल्या, “ताई, त्यावेळी तुम्ही शिवसेनेत नव्हत्या, वंदनीय बाळासाहेबांना शिव्याशाप देण्यात आणि उबाठा व आदूबाळाला दहीहंडीच्या थरावर चढवण्यात मग्न होत्या. त्यामुळे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. त्यामुळे ज्यांच्या आदेशाने तुम्ही ही टीवटीव करत आहात, त्यांना जाऊन विचारा – ‘ताज का राज’.” अशी ट्विट करून शितल म्हात्रे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.