क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
नागपूर : भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास यांनी नुकताच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. त्यांच्या राजीनाम्यामुळे नागपूर भाजपला मोठा धक्का बसला आहे. ज्या पक्षाच्या बांधणीसाठी आम्ही आमची तरुणाई घालवली, घरावर तुळशीपत्र ठेवलं, छोट्या छोट्या नोकऱ्या करून पक्षासाठी काम केले, त्याच पक्षात एखादा मोठा निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा कार्यकर्त्यांची आठवण येत नाही का? त्यांना विचारणा केली जात नाही. प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही आणि कुणीतरी एक व्यक्ती येतो आणि कुठलाही निर्णय घेतो. पक्षात असं जर होत असेल, तर हे भाजपच्या अंतर्गत संविधानाप्रमाणे नाही. पक्षाच्या नियमाप्रमाणे पार्लमेंटरी बोर्ड बसल्यानंतर उमेदवारी घोषित झाली पाहिजे. मात्र पदवीधर मतदारसंघात ती आधी का घोषित करण्यात आली? हे प्रश्न विचारले आहेत भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास यांनी. गिरीश व्यास यांनी आज अनिल सोले यांच्या बंडखोरीला पाठिंबा देत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यावेळी ते एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करत होते. यावेळी त्यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर भाष्य करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास यांनी नुकताच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. त्यांच्या राजीनाम्यामुळे नागपूर भाजपला मोठा धक्का बसला असून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. तर व्यास यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, व्यास यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आपले कार्यालय सोले यांच्या निवडणूक प्रचारासाठी उपलब्ध करून दिले आहे. या कार्यालयाचा शुभारंभ ही पार पडला असून, बडकस चौकातील हे कार्यालय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ असल्याने राजकीय वर्तुळात या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे.
पक्षांमध्ये सुधाकर कोहळे एक कार्यकर्ते असले, तर आम्हीही कार्यकर्ते आहोत, त्यामुळे पक्षाच्या संविधानाप्रमाणे नागपुरातून इच्छुक उमेदवारांचे नाव आधी पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवायला पाहिजे होते. मात्र तसे झाले नाही, पक्षाची ती प्रक्रिया पाळली गेली नाही, म्हणून आमचा कोहळेंच्या उमेदवारीला आक्षेप असल्याचे गिरीश व्यास म्हणाले. आमची लढाई पक्षात पुढच्या पिढीचे नुकसान होऊ नये यासाठीची आहे. यापुढे तरी पक्षाने पक्षाच्या ठरलेल्या चाकोरीतून जात निर्णय करावे, अशी आम्ही जुन्या कार्यकर्त्यांची भावना असल्याचेही गिरीश व्यास म्हणाले. भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे, असं म्हणणार नाही. मात्र, पक्षात अनेक जण कानामागून आले आणि तिखट झाले, अशी स्थिती आहे. आम्हाला त्यांच्यासारखी भापकेबाजी करता आली नाही. जर पक्षाला अशी भपकेबाजीच मान्य असेल, तर आम्हीही निर्णय घेतलाच पाहिजे. म्हणून मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे ठरविल्याचे व्यास म्हणाले.
पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना पक्षात पदाधिकारी केले जाते. पक्षातील बाकी कार्यकर्त्याचे मरण झाले आहे का? ते सक्रिय नाहीत का? त्यांची क्षमता संपली आहे का? आणि पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून ज्यांना पद देतो, ते खूप क्षमतावान आहोत का? तर नाही, असेही भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास म्हणाले.
नागपूर पदवीधर मतदारसंघ हा नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे या मतदारसंघाशी भावनिक नाते आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधराव फडणवीस याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून यायचे, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील महाराष्ट्राच्या विधिमंडळात याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून आपली ताकद झोकून दिली आहे.
भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनिल सोले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गिरीश व्यास यांनी सोले यांना पाठिंबा दिल्याने भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या प्रकरणामुळे नागपूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला गिरीश व्यास यांनी पक्षाच्या कार्यप्रणालीवरून नाराजी व्यक्त केली असता, दुसऱ्या बाजूला भाजपने या राजीनाम्याकडे गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. 'भाजपच्या बांधणीसाठी आम्ही तरुणाई घालवली, घरावर तुळशीपत्र ठेवलं' असे ते म्हणाले. 'कार्यकर्त्यांची आठवण येत नाही का?' असा सवाल त्यांनी केला. 'प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही' असेही ते म्हणाले. 'पार्लमेंटरी बोर्ड बसल्यानंतर उमेदवारी घोषित झाली पाहिजे, मात्र पदवीधर मतदारसंघात ती आधी का घोषित करण्यात आली?' असा प्रश्न त्यांनी विचारला. 'पक्षात अनेक जण कानामागून आले आणि तिखट झाले' असेही ते म्हणाले. अनिल सोले यांना पाठिंबा दिला आहे. या प्रकरणामुळे नागपूरमधील राजकीय वातावरण तापले आहे.


Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.