सियाचा भाऊ साहिलचा क्रिकेटमधून चेतनशी संपर्क; दिवाळी पार्टीत पुन्हा भेट; आरोपींचा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
पुणे : लोहगड किल्ल्याच्या खोल दरीत ढकलून करण्यात आलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांच्या तांत्रिक तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या प्रेमसंबंधांची सुरुवात कशी झाली, याचा खुलासा झाला आहे. सियाचा भाऊ साहिल याची तब्बल १० तास चौकशी करण्यात आली असून, या चौकशीतून अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
क्रिकेटच्या मैदानावर झाली पहिली भेट
सिया आणि चेतन चौधरी यांची पहिली ओळख कोणत्याही सोशल मीडिया किंवा कॉलेजमध्ये झाली नव्हती, तर ती एका क्रिकेट सामन्यादरम्यान झाली होती . सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे दोघे एकत्र क्रिकेट खेळायचे . साहिलचे सामने पाहण्यासाठी सिया नेहमी भावासोबत जात असे. याच मैदानावर सिया आणि चेतनची पहिली भेट झाली .
त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीत हे दोघे पुन्हा समोरासमोर आले . या पार्टीनंतर त्यांच्यात नियमित भेटीगाठी वाढू लागल्या. क्रिकेटच्या मैदानावर झालेली ही साधी ओळख पुढे मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंधात बदलली .
२००४ फोन कॉल्स अन् २३८ तासांचा संवाद
पोलिसांनी आरोपींचे सीडीआर (Call Detail Records) तपासले असता, सिया आणि चेतन यांच्यातील संबंधांची माहिती समोर आली. मागील काही महिन्यांत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २००४ वेळा फोनवर संपर्क झाला होता . या दोघांनी मिळून सुमारे २३८ तास संवाद साधला होता .
केतनसोबत लग्न ठरलेलं असतानाही सिया आणि चेतन तासनतास एकमेकांच्या संपर्कात होते आणि याच संवादादरम्यान केतनला रस्त्यातून हटवण्याचा म्हणजेच त्याच्या हत्येचा कट रचला गेल्याचा संशय पोलिसांना आहे .
साहिलची तब्बल १० तास चौकशी
१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालला दरीत ढकलण्यात आले, तेव्हा सीसीटीव्ही (CCTV) फुटेज मध्ये एक संशयास्पद तरुण भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घालून फिरताना दिसला होता . तो तरुण दुसरा कोणी नसून चेतन चौधरी होता, ज्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःचा फोन दुकानात कामगाराकडे ठेवला होता .
चेतन हा सियाचा भाऊ साहिलचा जवळचा मित्र असल्याने, या संपूर्ण कटाची माहिती साहिलला आधीपासून होती का? किंवा त्याने नकळत या दोघांना मदत केली का? याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी काल साहिलला ताब्यात घेऊन तब्बल १० तास चौकशी केली .
साहिलचे पोलिसांना सांगणे
साहिलने पोलिसांना सांगितले की, सियाला लग्नाबाबत काही हरकत असती, तर कुटुंबीयांनी ते लग्न थांबवले असते . त्याने सियाच्या चेतनसोबतच्या नात्याबद्दत विचारले असता, त्याला या नात्याची माहिती होती आणि तो सियाला लग्न झाल्यानंतर तो संबंध संपवण्याचा सल्ला देत होता .
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
दरम्यान, पोलीस कोठडीत असलेले दोन्ही आरोपी सिया आणि चेतन आता स्वतःचा बचाव करण्यासाठी एकमेकांवर हत्येच्या कटाचा दोषारोप करत आहेत .
चेतनचा आरोप: "मला सियासोबत पळून जायचे होते, पण केतनचा काटा काढण्याचा आग्रह सियानेच धरला" .
सियाचा आरोप "केतनच्या हत्येची मूळ कल्पना चेतनचीच होती".
पोलीस या दोघांची समोरासमोर बसवून चौकशी करत असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत .
क्रिकेटच्या मैदानापासून सुरू झालेली सिया आणि चेतनची मैत्री, शेवटी एका भीषण हत्याकांडाचे कारण बनली. सव्वादोन हजार फोन कॉल्स आणि शेकडो तासांच्या संभाषणांतून रचल्या गेलेल्या या कटाचा खुलासा होत आहे. सियाचा भाऊ साहिल हा तिच्या प्रेमसंबंधांपासून अनभिज्ञ नसल्याचे समोर आले आहे. आता पुढील तपासात हे स्पष्ट होईल की, या खुनाची कल्पना नेमकी कोणाची होती आणि या कटात साहिलचा किती सहभाग होता.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.