⚡ ब्रेकिंग News

'उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे सुपुत्र, ते कधीच मांडवली करणार नाहीत, ती चर्चा हास्यास्पद'; फडणवीस-ठाकरे विमान प्रवासावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

पेट्रोल वाचलं' म्हणत विनोद; 'एकनाथ शिंदे, अजित पवार यांनाही भाजप डच्चू देईल'; 'खासदारांची किंमत शून्य होईल'

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (शुक्रवारी) मुंबई ते नागपूर असा एकाच विमानाने प्रवास केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या प्रवासावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे 'बाळासाहेबांचे सुपुत्र' असल्याचे सांगत ते कधीच मांडवली करणार नाहीत, असे स्पष्ट केले.

 'हा योगायोग, पेट्रोलही वाचले'

रोहित पवार यांनी या प्रवासावर विनोदी शैलीत प्रतिक्रिया देताना म्हटले, "हा योगायोग आहे असं म्हणता येईल. दोन नेते एकाच विमानात असतील तर हरकत काय आहे? आणि त्याच्या बरोबर पेट्रोल सुद्धा वाचले असं म्हणता येईल."

यावेळी देवेंद्र फडणवीस मिश्कीलपणे म्हणाले होते, "आपण तिघे (फडणवीस, ठाकरे, संजय राऊत) एकत्र भेटलो, हीच बातमी आहे." यावर रोहित पवार म्हणाले, "तिघे लोक एकाच दिशेने प्रवास करत असेल तर ती बातमीच आहे."

 'उद्धव ठाकरे स्वाभिमानी, मांडवली करणार नाहीत'

रोहित पवार यांनी फडणवीस-ठाकरे भेटीवरून सुरू झालेल्या 'ठाकरे भाजपशी मांडवली करणार' या चर्चांना फेटाळून लावले. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे स्वाभिमानी आहेत, कारण ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. पण ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे जाऊन मांडवली करतील, असे जर लोकांमध्ये चर्चा असेल तर ती हास्यास्पद आहे."

त्यांनी पुढे स्पष्ट केले, "उद्धव ठाकरे यांचा पक्ष भाजपने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोनदा फोडला. आपलं घर, आपले खासदार, आपले आमदार, आपले कार्यकर्ते जर एखादा पक्ष फोडत असेल, तर आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचत असते."

 'अडचण एकनाथ शिंदे, अजित पवार यांची'

या भेटीवर भाजप नेत्यांची सकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याच्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, "भाजपने सकारात्मकता दाखवली असेल तर ती अडचण उद्धव ठाकरेंची नाही, ती अडचण एकनाथ शिंदे यांची आहे. हा प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारला पाहिजे."

त्यांनी अमित शाह यांच्या एका विधानाचा हवाला देत म्हटले, अमित शाहांनी आम्हाला सांगितले होते – दोन्ही कुबड्या आम्हाला नको. एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि दुसऱ्या बाजूला अजित दादांचा पक्ष. २०२९ च्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदे आणि अजित दादांच्या पक्षाचे अनेक आमदार फुटून भाजपात जातील."

'डी लिमिटेशन कायदा पास झाल्यास खासदारांची किंमत शून्य'

रोहित पवार यांनी डी लिमिटेशन कायद्याचा मुद्दा उपस्थित करत म्हटले, "डी लिमिटेशनचा कायदा पास करण्यासाठी भाजपला अजून ४१ खासदारांची गरज आहे. त्यामध्ये वीस खासदार टीएमसीचे, सहा खासदार उद्धव ठाकरे यांचे धरले आहेत. अजून ४१ खासदार त्यांना पाहिजे."

"या परिस्थितीत आज खासदाराची किंमत नक्कीच आहे. पण डी लिमिटेशनचा कायदा पास होईल असा आम्हाला वाटत नाही. तो कायदा चुकून पास झाला, तर या सगळ्या खासदारांची किंमत शून्य होणार आहे."

 'सहा खासदारांचा निर्णय लोकांना आवडला नाही'

उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारांच्या मतदारसंघातील दौऱ्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले,  शेवटी तिथे असलेल्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्या सहा खासदारांना निवडून आणण्यात उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा होता. शरद पवार यांनीही खंबीरपणे साथ दिली."

"तिथं जर हे सहा लोक गद्दारी करत असतील, तर ते कोणालाही आवडलं नाही. काल उद्धव ठाकरे नागपूरला पोहोचले, तेव्हा हजारो लोक तिथे आले होते. या सहा खासदारांचा निर्णय लोकांना आवडला नाही," असेही ते म्हणाले.

 राजकीय परिणाम

रोहित पवार यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विमानातील भेट ही केवळ योगायोग असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजप डच्चू देईल, असा इशारा दिला आहे. महायुतीची सत्ता आणि डी लिमिटेशन कायद्याच्या चर्चांना त्यांनी या वक्तव्यातून छेद दिला आहे.

फडणवीस-ठाकरे विमान प्रवास हा योगायोग असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र असल्याने ते कधीही 'मांडवली' करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, त्यांनी भाजपचे फोडाफोडीचे राजकारण आणि खासदारांची किंमत यावर टीका केली. आता उद्धव ठाकरे यांचा पुढील दौरा आणि महायुतीतील समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...