क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
पुणे / धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी पुण्यातून धाराशिवला जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली. ‘रीलस्टार म्हणून हिणवणी करणाऱ्यांना’ सडेतोड उत्तर देताना ते म्हणाले, “रीलस्टार असलेल्या माणसाला मतं टाकतात का?” त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा शोध घेणार असल्याचेही स्पष्ट केले.
‘मला रीलस्टार म्हणून हिणवता’
पत्रकार परिषदेत ओमराजे निंबाळकर म्हणाले, “तीन दिवसात नुसत्या चर्चेनं मी वाईट झालो का? रीलस्टार म्हणून हिणवणी केली गेली. पंचायत समिती आणि नगरपालिकेला मतदारसंघात मशालीवर एकही पंचायत समिती जिंकलो नाही.” त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेली हेटाळणी कशामुळे झाली, याचा शोध घ्यायचा असल्याचे स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “मी असेल, कैलास पाटील, प्रवीण स्वामी, सोपल साहेब असतील आम्ही २४ तास लोकांना देतो. आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. मात्र, अशा स्थितीत मशाल चिन्हावर उभ्या राहिलेल्या आमच्या लोकांना पराभवाचं तोंड का बघावं लागलं?”
‘मशालीवर एकही पंचायत समिती जिंकली नाही’
ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील स्थानिक निवडणुकांचा हवाला देताना म्हटले, “लोकसभा असेल, विधानसभा असेल यावेळी पैशांची ताकद असताना लोक पाठीशी राहिली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रात जेवढ्या पंचायत समित्या आहेत, नगरपालिका आहेत, त्यात एकही पंचायत समिती, नगरपालिका निवडून येऊ शकली नाही.”
त्यांनी आपल्या कार्यकर्त्याचे उदाहरण देताना सांगितले, “माझा सोमनाथ गुरव नावाचा कार्यकर्ता तिसऱ्या नंबरला गेला, मला त्याच प्रश्नाचा शोध घ्यायचा आहे. पक्षनेतृत्त्वाबाबत बोलू नका, आमच्या कामावरच मतं टाकणार होता, आमची हेटाळणी का झाली? माझा माणूस गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा नव्हता, ड्रग्ज डीलर नव्हता. लोकांसाठी काम करणारा होता.”
‘चार दिवसात निर्णय नाही, पण कुटुंबाचा उद्धार’
ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेबद्दल बोलताना म्हटले, “चार दिवसात माझा निर्णय जाहीर केला नाही पण माझ्या अख्ख्या कुटुंबाचा उद्धार करतात. ओमराजे ज्यांच्या उपयोगी पडलाय तो माणूस घरातल्या व्यक्तीचा उद्धार करेल असं वाटलं नव्हतं पण ते करण्यात आलं, ते मी सहन केलं. माझ्या कुटुंबानं तुमचं काय वाटोळं केलंय?”
ते पुढे म्हणाले, “माझ्या नुसत्या चर्चेनं मी तीन दिवसात वाईट होत असेल तर खरंच वाईट आहे.”
‘सन्माननीय उद्धवजी, आदित्यजी यांच्याबद्दल अवाक्षर नाही’
ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (UBT) चे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “सन्माननीय उद्धवजी, सन्माननीय आदित्यजी आणि बाळासाहेबांच्या कुटुंबाबद्दल माझं कधीच अवाक्षर जाणार नाही, गेलेलं नाही.”
त्यांनी एका वृत्तवाहिनीवर आपली न बोललेली मुलाखत छापल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “दुर्दैवानं माझी मुलाखत छापली, मी बोललो असेल तर छापावं, न बोलताच छापल्यानं मला दु:ख आहे.”
‘आज कार्यकर्त्यांसोबत बोलून घेईन निर्णय’
ओमराजे निंबाळकर यांनी आपला राजकीय निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “आज धाराशिवला जातोय, गोवर्धनवाडी येथे कार्यकर्त्यांना बोलावलं आहे. चार वाजता कार्यकर्त्यांसोबत बोलून निर्णय घेणार आहे.”
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालाबद्दल बोलताना ते म्हणाले, “३ जून २००६ ला आमच्या आणि समद काझीच्या परिवारानं वेदना भोगली तिच वेदना काल भोगली. कोर्टानं राजकीय वैमनस्य होतं, म्हटलं, मग मारलं कोणी? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.” त्यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही स्पष्ट केले
‘सामान्य माणसानं मला इथपर्यंत पोहोचवलं’
ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना म्हटले, “ज्या दिवशी वडील गेले, त्याच दिवशी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सामान्य लोक देखील सगळे जाणतात, जो न्याय माझा परिवार मागत होता तो मिळू शकला नाही.”
ते पुढे म्हणाले, “माझ्या वडिलांची हत्या होती ती राजकीय होती. एका माणसाला मारल्यानं तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो, हे दाखवून द्यायचं होतं. मी हे वारंवार सांगतोय. सामान्य माणसानं मला आजपर्यंत इथंपर्यंत पोहोचवलं आहे. सामान्य माणसांसोबत चर्चा करुन निर्णय घेणार आहे.”
‘मला सुरक्षेची गरज नाही’
पत्रकार परिषदेच्या शेवटी ओमराजे निंबाळकर म्हणाले, “मी सामान्य माणूस असून मला सुरक्षेची गरज नाही.” या वक्तव्याने त्यांनी आपली साधेपणा आणि जनसंपर्काची ताकद अधोरेखित केली.
आता काय?
ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टपणे सांगितले की, ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कोणतेही अवाक्षर करणार नाहीत. मात्र, स्थानिक निवडणुकांमधील पराभव आणि कार्यकर्त्यांच्या भावना यांचा विचार करूनच आपला निर्णय घेणार आहेत. आज संध्याकाळी धाराशिवमध्ये होणारी ही बैठक निर्णायक ठरणार आहे. सर्वांचे डोळे या बैठकीकडे आणि ओमराजे घेणाऱ्या निर्णयाकडे लागले आहेत.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.