हत्येनंतर अंतर ठेवण्याचा होता बेत; चेतनचा दावा – 'सियानेच खून करायला सांगितले'; सिया म्हणाली – 'चेतन रडला आणि स्वतः जबाबदारी घेतली'
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
लोणावळा / पुणे : लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात दररोज नवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ हत्येचा कट रचला नाही, तर गुन्ह्यानंतर पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी अत्यंत हुशारीने नियोजन केले होते . पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
संशय टाळण्यासाठी अंतर ठेवण्याचा प्लॅन
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवालला दरीत ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतनने ठरवले होते की, ते पुढील काही दिवस एकमेकांना अजिबात भेटणार नाहीत . केतनचा मृत्यू हा केवळ एक अपघात आहे, असे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अचानक त्यांच्या भेटीगाठी वाढल्यास पोलिसांना किंवा कुटुंबीयांना त्यांच्यावर संशय येईल, याच भीतीने त्यांनी हत्येनंतर एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता .
मोबाईल चॅट्स डिलीट; पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
दोघांमधील प्रेमसंबंध आणि हत्येच्या कटाची माहिती कोणाच्या हाती लागू नये, यासाठी सिया आणि चेतनने आपल्या मोबाईलमधील सर्व चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स डिलीट करून टाकले होते . पोलिसांच्या पकडीतून सुटण्यासाठी आणि कोणताही पुरावा मागे न ठेवण्यासाठी या दोन्ही आरोपींनी सर्व शक्य प्रयत्न केले .
पण आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला, तरी पोलीस तांत्रिक तपासाच्या जोरावर त्यांचे बिंग फोडणार आहेत. लोणावळा पोलिसांनी दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त केले असून ते फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये (Forensic Lab) पाठवले आहेत . फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने डिलीट केलेले व्हॉट्सॲप चॅट्स, मेसेजेस आणि इतर डेटा पुन्हा रिकव्हर केला जाणार आहे .
प्रियकर चेतनचा खुलासा
पोलिसांच्या चौकशीत चेतन चौधरीने एक वेगळीच बाजू मांडली आहे. चेतनच्या म्हणण्यानुसार, त्याला सियासोबत पळून जाऊन कुठेतरी दूर नव्याने आयुष्य सुरू करायचे होते . मात्र, सियाचाच असा आग्रह होता की पळून जाण्याने काही होणार नाही, कारण तिचे कुटुंब प्रचंड श्रीमंत आहे आणि ते त्यांना जगाच्या पाठीवर कुठूनही शोधून काढतील. या लग्नातून सुटकेचा खून' हाच एकमेव उपाय असल्याचे सियानेच निश्चित केले होते, असा दावा चेतनने केला आहे .
सियाने आळ उलटवला
चेतनच्या या दाव्याच्या पूर्णपणे उलट कहाणी सियाने पोलिसांना सांगितली आहे. सियाचा आरोप आहे की, केतनच्या खुनाचा कट सुरुवातीपासूनच चेतनने रचला होता . लोहगडावर झालेल्या पहिल्या दोन ट्रेक मध्ये सियाला केतनला दरीत ढकलण्याचे धाडस झाले नाही . १४ जून रोजी झालेला प्रयत्न जेव्हा अयशस्वी ठरला, तेव्हा चेतन हताश झाला आणि रडू लागला. त्यानंतर त्याने सियाला स्पष्ट सांगितले की, "तुला हे जमणार नाही, आता ही जबाबदारी मी घेतो आणि हे काम पूर्ण करतो".
महाबळेश्वरमध्ये घालवायचा होता एकांतात वेळ!
एका मराठी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चेतनने तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्यामागे एक खास हेतू होता. त्याला सियाला केतनच्या बंधनातून लवकरात लवकर मुक्त करायचे होते, जेणेकरून केतनचा काटा निघाल्यानंतर त्या दोघांना महाबळेश्वर मध्ये एकत्र जाऊन एकांतात वेळ घालवता येईल .
धक्कादायक बाब म्हणजे, केतनची हत्या केल्यानंतरही हे दोघे सतत एकमेकांच्या संपर्कात होते. तपास अधिकाऱ्यांच्या मते, पोलीस कोठडीत असलेल्या या दोन्ही आरोपींच्या चेहऱ्यावर आपल्या कृत्याबद्दल कसलाही पश्चात्ताप दिसून आलेला नाही .
केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया आणि चेतन यांनी हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स डिलीट करून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांची फॉरेन्सिक तपासणी आता डिलीट डेटा रिकव्हर करून कटाची साखळी उघड करणार आहे. सिया आणि चेतन एकमेकांवर दोषारोप करत असले, तरी वस्तुस्थिती लवकरच समोर येईल. या दोघांच्या निर्दयी मानसिकतेने संपूर्ण समाजाला धक्का दिला आहे. आता न्यायालयात हा पुरावा कसा सादर होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.