⚡ ब्रेकिंग News

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनची जोरदार आगेकूच; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज


पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस, सिंधुदुर्गात ८० मिमी पावसाची नोंद; मुंबईत 'यलो अलर्ट'; शेतकऱ्यांना दिलासा

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

मुंबई : राज्यात चातकासारखी वाट पाहायला लावणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाने (Monsoon) अखेर मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत जोरदार आगेकूच केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सून मुंबईत अधिकृतपणे दाखल झाल्याची घोषणा केली आहे. सद्यस्थितीत डहाणू, वर्धा, रायपूर आणि मोतिहारी पर्यंत मान्सूनची रेषा विस्तारली असून, येत्या २ ते ३ दिवसांत हा मान्सून गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आणखी प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 मुंबईत पावसाचा जोर; वाहतूक कोंडी

सकाळपासूनच मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला असून, शहराच्या बहुतांश भागात दमदार पाऊस झाला आहे. सायन परिसरात पावसाची संततधार कायम असून, ऐन गडबडीच्या वेळी बेस्ट बस (BEST Bus) बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. हवामान विभागाने मुंबईत आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पुढील २४ ते ४८ तासांसाठी मुंबईत 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

मुंबईत प्रवेश केल्यानंतर मान्सूनचा वेग वाढण्याची शक्यता असून, २४ ते २७ जून दरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील अंतर्गत भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

 पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; नागरिक हैराण

मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुण्यातही तुफानी पाऊस बरसला. जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला, ज्यामुळे रस्ते, ओढे आणि नाल्यांना थेट नद्यांचे स्वरूप आले. अचानक आलेल्या या पुरामुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेती व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने याबाबत यलो अलर्ट जारी केला आहे.

 सिंधुदुर्गात मुसळधार; शेतकऱ्यांना दिलासा

सिंधुदुर्गात कालपासून पाऊस पूर्णपणे सक्रिय झाला असून, जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८०.८७ मिमी पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस देवगड तालुक्यात (१२६ मिमी) झाला आहे. पाऊस परतल्यामुळे शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे. पुढील पाच दिवस जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून येथेही 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून, भातशेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. विहिरी, ओढे आणि स्थानिक जलस्रोतांची पातळी वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 रायगड, जळगाव, नाशिकसह अनेक जिल्ह्यांत पाऊस

रायगड जिल्ह्यात सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण दिसून येत असून, पावसाची रिमझिम सुरू आहे. दक्षिण भागातील माणगाव, म्हसळा, महाड आणि पोलादपूर तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला आहे.

नाशिक शहरासह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली असून, पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

 पुढील २४ तास; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यांना आज दक्षतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात २३ जूनच्या आसपास मान्सून आणखी पुढे सरकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस राज्यात पावसाची स्थिती अनुकूल राहण्याची शक्यता आहे.

मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत मान्सूनने अखेर जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, नाशिक, जळगावसह अनेक ठिकाणी दमदार पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला आहे. मात्र, पुण्यातील ढगफुटीच्या पावसाने काही भागात पाणी अडचणी निर्माण केल्या आहेत. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना 'यलो' आणि 'ऑरेंज' अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस नवसंजीवनी समान आहे, तर पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भागांसाठीही हा मोठा दिलासा आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...