भिवंडीत मध्यरात्री धाड; खोटी विल्हेवाट प्रमाणपत्रे; फॅसिलिटी मॅनेजरसह दोघांवर गुन्हा; नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
भिवंडी : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यात बेकायदेशीर आणि मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांविरोधात कारवायांचा धडका सुरू आहे . याच मोहिमेचा भाग म्हणून भिवंडी तालुक्यातील सरवली येथील 'ॲमेझॉन रिटेल इंडिया' (Amazon Retail India) या नामांकित कंपनीच्या गोदामावर अन्न सुरक्षा पथकाने मोठी कारवाई केली आहे . मुदतबाह्य झालेले आणि मानवी आरोग्यास घातक ठरणारे अन्नपदार्थ नष्ट न करता, नागरिकांची दिशाभूल करून ते पुन्हा विक्रीसाठी अन्नसाखळीत वळवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे .
खोटे प्रमाणपत्र सादर करून फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, सरवली येथील 'ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.' आणि आर. के. ट्रेडर्स' यांच्या संगनमताने मुदतबाह्य झालेले अन्नपदार्थ नष्ट न करता ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याची खात्रीशीर माहिती अन्न सुरक्षा पथकाला मिळाली होती . या माहितीच्या आधारे बुधवारी (२४ जून) मध्यरात्री पथकाने या गोदामावर अचानक धाड टाकली .
या कारवाईदरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. मे. आर. के. ट्रेडर्स' चे मालक रहमान के. यांनी कराराचे पालन न करता, हे मुदतबाह्य अन्नपदार्थ नष्ट केल्याचे खोटे विल्हेवाट प्रमाणपत्र सादर केले होते . प्रत्यक्षात मात्र, हे मानवी आरोग्यास घातक ठरू शकणारे अन्नपदार्थ बाजारात पुन्हा विक्रीसाठी पाठवले जात होते .
या संपूर्ण काळ्या बाजारात ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि. चे कालबाह्य व खराब अन्नपदार्थ विल्हेवाट हाताळणारे संबंधित कर्मचारी आणि पश्चिम क्षेत्राचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नूर हे थेट सामील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे .
गोदामाचा परवाना रद्द
सरवली (भिवंडी) येथील ज्या अमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.च्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली, त्या विशिष्ट आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे . मुदतबाह्य व खराब अन्नपदार्थांची विल्हेवाट लावण्याऐवजी ते पुन्हा विक्रीसाठी वळवल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, हा निर्णय केवळ संबंधित गोदामाच्या परवान्यापुरताच लागू आहे .
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद वसंत कांडेलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात 'मे. आर. के. ट्रेडर्स'चे मालक रहमान के. आणि 'ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.'चे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नूर या दोघांविरोधात गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला आहे .
नागरिकांच्या जिवाशी खेळून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ (४), २७४, ३(५) सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २६(१), २६(२)(आय), २७(१), २७(३)(ई) आणि ३१(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत .
तुकाराम मुंढे यांची कारवाई
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे अन्नपदार्थांचा काळा बाजार करणाऱ्या माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे . मुंढे यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील अन्नसुरक्षा यंत्रणा अधिक कडक केली आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी मुदतबाह्य अन्नपदार्थ आणि बनावट उत्पादनां विरोधात अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत .
या कारवाईनंतर मुंढे म्हणाले, "नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही कंपनीला सवलत दिली जाणार नाही. मुदतबाह्य अन्नपदार्थांची विल्हेवाट लावण्याऐवजी ते पुन्हा विक्रीसाठी वळवणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा कृत्यांमागे कोणीही असो, कारवाई केली जाईल."
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने ॲमेझॉन रिटेल इंडियाच्या गोदामाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. मुदतबाह्य अन्नपदार्थ पुन्हा विक्रीसाठी वळवण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. खोटी विल्हेवाट प्रमाणपत्रे सादर करून फसवणूक करणाऱ्या रहमान के. आणि फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर कोन्नूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही कंपनीला सवलत दिली जाणार नाही. या कारवाईमुळे अन्नसुरक्षा यंत्रणा अधिक कडक झाली असून, अन्नपदार्थांच्या काळाबाजारातील माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.