⚡ ब्रेकिंग News

शाब्बास रं पठ्ठ्या! उखलगावच्या तीन सख्ख्या भावांनी MPSCत गाजवले यश; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अधिकारीपदाला गवसणी

  शाब्बास रं पठ्ठ्या! उखलगावच्या तीन सख्ख्या भावांनी MPSCत गाजवले यश; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अधिकारीपदाला गवसणी

 दिलीप, विजय आणि अजय चंदनची प्रेरणादायी कहाणी; एका कुटुंबातून तीन अधिकाऱ्यांची निर्मिती

"जिद्द, प्रामाणिक कष्ट आणि सातत्याच्या जोरावर स्वप्न सत्यात उतरवता येतात", याचे मूर्तिमंत उदाहरण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव या छोट्याशा गावातून समोर आले आहे. येथील चंदन कुटुंबातील तिघा सख्ख्या भावांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि दुर्गम भागात राहूनही या तिघा भावांनी स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे. कुटुंबातील सर्वात मोठे भाऊ दिलीप मालन चंदन हे नागपूर गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. दुसरे भाऊ विजय मालन चंदन हे पुणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. तर आता तिसरे भाऊ अजय मालन चंदन यांनीही या परंपरेला जपत राज्य कर निरीक्षक (एसटीआय) म्हणून निवड झाली आहे.

दुर्गम गावातून अधिकारीपदापर्यंतचा प्रवास

श्रीगोंदा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या उखलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेत अजय चंदन यांनी राज्य कर निरीक्षक पदाला गवसणी घातली. त्यांनी पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून समाजशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. दोन मोठ्या भावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अजयने एमपीएससीचा ध्यास धरला आणि केडगाव, अहिल्यानगर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत यश मिळवले.

शिक्षक ते अधिकारी असा प्रवास

मोठे भाऊ दिलीप चंदन सुरुवातीला शिक्षक होते. त्यांनी २०१० मध्ये एमपीएससीच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पद गाठले. त्यानंतर विजय चंदनही शिक्षक असताना २०१२ मध्ये पोलीस उपनिरीक्षक झाले. मात्र या दोन्ही भावांना एमपीएससीची परीक्षा फक्त स्वस्त बसू देणारी नव्हती. त्यामुळे दोघांनीही पुन्हा तयारी करत पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पद गाठले. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अजयनेही हे यश मिळवले आहे.

उखलगावमध्ये प्रेरणेचे स्रोत

दिलीप चंदन यांच्या यशानंतर उखलगावमध्ये स्पर्धा परीक्षेची क्रेझ निर्माण झाली. त्यांच्यापासून प्रेरणा घेत गावातील जवळपास १५ हून अधिक तरुणांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे ग्रामस्थ सांगतात. एकाच कुटुंबातील तिघा सख्ख्या भावांनी अधिकारी होण्याचा पराक्रम केल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

भावांच्या प्रतिक्रिया

"अजयमध्ये अधिकारी होण्याची क्षमता असल्याचे आम्हा भावांना नेहमीच वाटायचे. आम्ही त्याला मार्गदर्शन केले आणि त्यानेही कष्टाचे चीज करून दाखवले. आमच्या आईलाही याचा प्रचंड आनंद झाला आहे," अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक दिलीप चंदन यांनी दिली.

अजय चंदन म्हणाले, "या यशामागे आई, भाऊ आणि मित्रांचे योगदान मोलाचे आहे. स्पर्धा परीक्षेत सातत्य, जिद्द, चिकाटी आणि योग्य नियोजन खूप महत्त्वाचे आहे. मिळालेले यश स्वतःपुरते न ठेवता गावातील इतर मुलांनाही प्रेरणा देत राहील."

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...