ठाणे: ठाणे शहरातील बहुतांश भागात आज रविवार, २९ मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड अस्वस्थता सहन करावी लागत आहे. विशेषतः वागळे इस्टेट, वसंत विहार, घोडबंदर रोड, ओळवा आणि कोलशेत परिसरात ५ ते ७ किलोमीटरच्या आसपासच्या भागात बत्ती गुल असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पुरवठा सुरळीत झाला असला तरी बहुतांश भाग अद्याप अंधारात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पडघा येथील EHV (एक्स्ट्रा हाय व्होल्टेज) तांत्रिक बिघाडामुळे ठाणे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. एकीकडे तापमान वाढले असताना आणि रविवारी सुट्टीचा दिवस असताना नागरिकांना प्रचंड उकाडा आणि गर्मीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुकाने, घरगुती कामे आणि दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम झाला आहे.
महावितरणकडून याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, बिघाड दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी पुरवठा कधी पूर्ववत होईल याबाबत महावितरणच्या अधिकृत चॅनेल्सवरून माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
वीजदर कपातीवर शिक्कामोर्तब; २०३० पर्यंत दरवर्षी सवलत
दुसरीकडे, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) महावितरणच्या २०२५-२६ ते २०२९-३० या पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर आपला अंतिम आदेश दिला आहे. या आदेशानुसार घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिकसह सर्व प्रवर्गातील वीजदर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होणार आहेत. कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नाहीत.
आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जनसुनावणी घेऊन नैसर्गिक न्याय तत्त्व पाळून हा नवा आदेश जारी करण्यात आला आहे.
१ एप्रिल २०२६ पासून या आदेशाचा दुसरा वर्ष सुरू होत असून, वीज ग्राहकांना आणखी सवलत मिळणार आहे. उदाहरणार्थ, स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ५ पर्यंतच्या वीजवापरावर प्रति युनिट ८५ पैसे सवलत मिळेल. दरवर्षी १ एप्रिलला ही सवलत वाढत जाणार आहे.
महावितरणच्या ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून, पाच वर्षांत सरासरी ४ ते २६ टक्के वीजदर कपात होण्याची शक्यता आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.