"दादांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात पक्ष एकत्र येऊन मोठा झाला तर सर्वांनी सकारात्मकपणे स्वीकारावा" - आमदार सुनील शेळके
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाचे आणि सकारात्मक विधान केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या स्थितीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता अद्याप संपलेली नसल्याचे सांगतानाच, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला मान्यता देऊन विलीनीकरण झाले तर त्याचा अभिमान वाटेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुनील शेळके म्हणाले, “दादांच्या दुर्घटनेनंतर शरद पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांनी आमच्याशी चर्चा केली होती. दोन्ही पक्ष एकत्र पुढे जाण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत होते. मात्र, दादांनी याबाबत विस्तृत चर्चा केलेली नव्हती. तरीही अजूनही वेळ गेलेली नाही. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरण करून पुढे जात असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल, तर आम्हाला त्याचा अभिमान वाटेल. आमचा पक्ष मोठा होत असेल तर सर्वांनी सकारात्मकपणे पाहिले पाहिजे.”
शेळके यांनी अजित पवार यांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्री पदाचा सन्मान मिळाला पाहिजे, ही आपली भूमिका पक्षातील कार्यकर्त्यांची एकच होती, असेही सांगितले. “आज सुनेत्रा वहिनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली तर दोन्ही पक्ष एकत्र येणे शक्य आहे,” असे ते म्हणाले.
“दादांची उणीव पावलोपावली भासतेय”
आमदार शेळके यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, दैनंदिन कामकाजात आणि विधिमंडळात अजित दादांची उणीव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. “ज्या नेत्याने ३०-३५ वर्षे महाराष्ट्रासाठी झिजवले, पुणे जिल्हा आणि मावळ तालुक्यासाठी अनेक प्रकल्प आणले, त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. संत तुकाराम महाराज पांढरा डोंगर कॉरिडोरसारखे स्वप्न दादांचे होते, ते पूर्ण व्हावे अशी अपेक्षा आहे,” असे शेळके म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दादांचे स्वप्न पूर्ण होतील, असा विश्वास आहे. अजित दादांच्या अपघाताचे सत्य लवकरच मुख्यमंत्री फडणवीस सर्वांसमोर आणतील.”
विलीनीकरण हाच पर्याय
सुनील शेळके यांच्या मते, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकसंघ व बळकट करण्यासाठी दोन्ही पक्षांचे विलीनीकरण हाच एकमेव पर्याय आहे. ज्यांना सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मान्य नसेल, ते पक्ष सोडून इतर पक्षात जाऊ शकतात, असेही त्यांनी सूचित केले.
हे विधान राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर देणारे ठरले आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकत्र येण्याची शक्यता वाढली असल्याचे संकेत शेळकेंच्या बोलण्यातून मिळाले आहेत.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.