जयंत पाटलांच्या 'छुपी मदती'च्या वक्तव्याने संतापलेले संजयकाका म्हणाले, "विश्वासघातकी राजकारणाचा साक्षीदार आहे, काळा इतिहास उघडकीस आणला तर..
सांगली : सांगली जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेनंतर झालेल्या राजकीय रणनीतीनंतर आता सांगलीच्या राजकारणात वादाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून झालेल्या 'छुपी मदती'चा दावा केल्यानंतर संजयकाकांनी संताप व्यक्त करत जयंत पाटलांना खुले आव्हान दिले आहे.
जयंत पाटलांनी अलीकडेच सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर मोठा गौप्यस्फोट केला होता. भाजपच्या गोटातील हालचालींची इत्थंभूत माहिती मिळवून देण्यासाठी संजयकाका पाटलांना आम्हीच पाठवले होते, असे विधान करून जयंत पाटलांनी खळबळ उडवून दिली होती.
या वक्तव्यावर संजयकाका पाटील यांनी पलटवार करत जयंत पाटलांना सडकून टीका केली. ते म्हणाले, "जयंत पाटलांनी आगीशी खेळ खेळू नये. त्यांनी आयुष्यभर विश्वासघातकी राजकारण केले आहे. मी त्यांना कधीही नेता मानले नाही. त्यांनी केलेले वक्तव्य अतिशय बालिश आहे. अशा पद्धतीने राजकारण खेळू नये."
पुढे बोलताना संजयकाकांनी जयंत पाटलांना मोठे आव्हान देत स्पष्ट केले की, "तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर तुमच्या सगळ्या काळ्या इतिहासाचा मी साक्षीदार आहे. तो इतिहास काढायला लागलो, तर २० ते २५ पत्रकार परिषदा घ्याव्या लागतील. तुमचा काळा इतिहास काढायला सांगू नका."
दुसऱ्याचे राजकारण अडचणीत यावे अशी वक्तव्ये केल्याचा आरोप करत संजयकांनी पुढे सांगितले की, "जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर जयंत पाटलांनी अतिशय कुजकट विधाने केली आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही किती उंबरठे झिजवले याचा साक्षीदार मी आहे. राजकीय साटेलोटे करण्यासाठी कायकाय केले हे आम्हाला सर्व माहीत आहे. विश्वासघाताचे राजकारण करणाऱ्यांनी असल्या वक्तव्यापासून अलिप्त राहावे."
आपण कधीही कुणाचे उंबरठे झिजवले नसल्याचे स्पष्ट करत संजयकाका म्हणाले, "मी संघर्षातून पुढे आलो आहे. लोकसभेत पराभव झाला, विधानसभेत पराभव झाला, पण राजकीय पुनर्वसनासाठी मी कुणाचे उंबरठे झिजवले नाहीत. अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांना आदरांजली म्हणून आम्हाला अध्यक्षपद द्या अशी मागणी केली होती. मात्र, आदल्या दिवशीच अध्यक्षपद देता येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर घडामोडी समजल्यानंतर मी ठरवले की, अशा विश्वासघातकी माणसांसोबत राहण्यापेक्षा बाहेर पडणेच योग्य."
ही घडामोड अशी
जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत महायुतीचा कार्यक्रम यशस्वी करताना भाजपमधील हालचालींची माहिती संजयकाका पाटलांकडून पडद्यामागून मिळत असल्याचा दावा केला होता. या 'छुपी मदती'च्या वक्तव्यानेच स्थानिक राजकारणात वाद निर्माण झाला आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.