बदलापूर: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाने घराघरात पोहोचलेला अभिनेता विराज जगताप याचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच निखील बनेचा अपघात झाल्यानंतर आता हास्यजत्रेच्या आणखी एका अभिनेत्याचा अपघात झाल्याने चाहते चिंतेत आहेत.
२४ मार्च रोजी रात्री विराज जगताप आपल्या मित्राकडे कौटुंबिक कार्यक्रमातून घरी परत येत असताना आदर्श मंदिराजवळील गतीरोधकावर (स्पीड ब्रेकर) अपघात झाला. गतीरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने त्याला अंदाज आला नाही. यामुळे त्याच्या गाडीचा ताबा सुटला आणि गाडी घसरली.
या अपघातात विराज जगताप यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या मनगटावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले.
प्रशासनावर संताप
बदलापूर परिसरात अनेक ठिकाणी गतीरोधकांवर पांढरे पट्टे नसणे आणि नियमबाह्य गतीरोधक उभारणे हे नेहमीचे चित्र आहे. शासकीय नियमांनुसार गतीरोधक ठरावीक उंचीचे असावेत आणि रात्री स्पष्ट दिसण्यासाठी त्यावर चिन्हे असावीत. मात्र, बदलापूरमध्ये हे नियम मोठ्या प्रमाणात पाळले जात नाहीत.
या पार्श्वभूमीवर नागरिक आणि अभिनेत्याचे चाहते प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. “एखादी गंभीर दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही का? गतीरोधकांवर साधे पांढरे पट्टे रंगवण्यासाठीही निधी नाही का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकीकडे शहरात विकासकामांच्या घोषणा होत असताना, दुसरीकडे रस्त्यांच्या देखभालीकडे आणि मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.
विराज जगताप यांच्या प्रकृतीबाबत अपडेट येत असून, त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी चाहते आणि मराठी मनोरंजन विश्वात शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.