बिहारमधून संसदेत जाणार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष; महाराष्ट्रातील 7 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची उत्सुकता शिगेला
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने पहिल्या टप्प्यात ९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून, यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
देशभरातील १० राज्यांमधील ३७ राज्यसभा जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ५ मार्च आहे. त्यापूर्वी भाजपने बिहार, आसाम, छत्तीसगड, हरियाणा, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांमधील एकूण ९ जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत.
कोणाला मिळाली उमेदवारी?
भाजपच्या पहिल्या यादीनुसार, बिहारमधून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह शिवेश कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आसाममधून तेराश गोवाला आणि जोगेन मोहन, छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा, हरियाणामधून संजय भाटिया, ओडिशामधून मनमोहन सामल आणि सुजीत कुमार तर पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील समीकरणे काय सांगतात?
राज्यसभेच्या या निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजेच ७ जागा रिक्त होत आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणाचे लागलेले लक्ष या निवडणुकीकडे आहे. येत्या काही दिवसांत भाजप महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. रामदास आठवले, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांच्यासह काही विद्यमान खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.
या जागांसाठी भाजपकडून विनोद तावडे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, विजया रहाटकर, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार, दिलीप कांबळे, माधव भंडारी, अमर साबळे, प्रीतम मुंडे आणि डॉ. संगीता फुसाटे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.
मागील आठवड्यात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली असून, राज्यातील संभाव्य उमेदवारांची नावे सुचवल्याचे समजते.
महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळ पाहता, भाजप सहजगत्या तीन जागा जिंकू शकते. चौथ्या जागेसाठी पक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. याशिवाय, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही एक जागा जिंकता येईल. तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी ३७ आमदारांची मते आवश्यक आहेत.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.